Jhimma 2 : पहिल्या दिवशी ‘झिम्मा 2’ची जबरदस्त कमाई; सात मैत्रिणींच्या कथेला दमदार प्रतिसाद

| Updated on: Nov 25, 2023 | 11:29 AM

'झिम्मा 2' हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला असून पहिल्या दिवशी या चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळाला. सात मैत्रिणींची नवी कथा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. हा चित्रपट 'झिम्मा'चा रेकॉर्ड मोडणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Jhimma 2 : पहिल्या दिवशी झिम्मा 2ची जबरदस्त कमाई; सात मैत्रिणींच्या कथेला दमदार प्रतिसाद
Jhimma 2
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : 25 नोव्हेंबर 2023 | दोन वर्षांपूर्वी ‘झिम्मा’ या चित्रपटातून सात मैत्रिणी प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आणि त्यांच्या कथेनं सर्वांची मनं जिंकली. आता दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा सात जणी ‘झिम्मा 2’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. कारण पहिल्या भागाला तसा दमदार प्रतिसाद मिळाला होता. दुसऱ्या भागातही हेमंतने सात जणींच्या सात तऱ्हा दाखवल्या आहेत. मैत्रिणींची ही ‘झिम्मा’ड कथा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहे. 24 नोव्हेंबर रोजी ‘झिम्मा 2’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून पहिल्या दिवशी दमदार कमाई झाली आहे.

‘झिम्मा 2’ची कमाई

इरावती कर्णिक लिखित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा 2’ हा चित्रपटसुद्धा पहिल्या भागाप्रमाणेच एक नवीन उमेद मनात निर्माण करतो. पहिल्या भागातीत नायिकांची एकमेकांशी फारशी ओळख नव्हती. पण आता त्या खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या आहेत. ही मैत्री निर्माण झाल्यानंतर त्यांच्या नात्यात आणि कथेत काय नाविन्य पहायला मिळेल, याची उत्सुकता ‘झिम्मा 2’ टिकवून ठेवतो. Sacnilk ने दिलेल्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने 24 नोव्हेंबर रोजी 1 कोटी 20 लाख रुपये कमावले आहेत.

‘झिम्मा 1’चा विक्रम मोडणार का?

‘झिम्मा 2’च्या निमित्ताने पुन्हा एकदा सात जणी एकत्र सहलीला निघाल्या आहेत. मात्र यावेळी दोन नवीन पात्रं या चित्रपटात पहायला मिळतात. त्यापैकी एक म्हणजे निर्मलाची सून तान्या (रिंकू राजगुरू) आणि दुसरी म्हणजे वैशालीची भाची मनाली (शिवानी सुर्वे). या दोन्ही अभिनेत्रींनी उत्तम काम केलंय. ‘झिम्मा’चा पहिला भाग थिएटरमध्ये जवळपास 50 पेक्षा अधिक दिवस होता. 50 दिवसांत या चित्रपटाने तब्बल 14 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

हे सुद्धा वाचा

‘झिम्मा 2’ला मुंबई आणि पुणेसारख्या शहरांमधून चांगला प्रतिसाद मिळतोय. याशिवाय नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, सांगली या भागातूनही प्रेक्षकांची पसंती मिळतेय. या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचं लेखन इरावती कर्णिक यांनी केलं आहे.

चित्रपटात सात नायिका आणि एक नायक आहे म्हटल्यावर कथेत समतोल साधण्याचं मोठं आव्हान लेखकासमोर असतं. मात्र हे काम इरावती कर्णिक यांनी पुन्हा एकदा तितक्याच सहजतेनं पार पाडलं आहे. विशेष म्हणजे यापैकी कोणाचीच कथा रटाळवाणी वाटत नाही. छोटे छोटे तुकडे एकत्र जोडावेत आणि त्याचा एक मोठा आणि सुंदर चित्र तयार व्हावा, असा हा लेखिकाचा प्रयत्न पुन्हा एकदा यशस्वी ठरतो.