नुकत्याच पार पडलेल्या 94व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील (Oscars 2022) एका घटनेची चर्चा अजूनही सोशल मीडियावर आणि कलाविश्वात होत आहे. ऑस्करच्या मंचावर जाऊन अभिनेता विल स्मिथने (Will Smith) पत्नीची मस्करी करणाऱ्या निवेदकाच्या (Chris Rock) कानशिलात लगावली. यावरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. आता प्रसिद्ध कॅनेडियन-अमेरिकन अभिनेता जिम कॅरे (Jim Carrey) याने घटनेविषयी संताप व्यक्त केला आहे. “कानाखाली वाजवल्याचं कौतुक काय करता”, असा सवाल त्याने हॉलिवूड कलाकारांना केला आहे. कानाखाली वाजवल्याच्या घटनेनंतर विल सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर गेला. तेव्हा उपस्थितांनी उभं राहून त्याचा सन्मान केला. याच गोष्टीवरून जिमने राग व्यक्त केला आहे. “जर मी क्रिसच्या जागी असतो तर विलविरोधात 20 कोटी डॉलर्सचा खटला दाखल केला असता”, असंही त्याने म्हटलंय.
एका मुलाखतीत जिम या घटनेविषयी म्हणाला, “ज्याप्रकारे लोकांनी उभं राहून त्याचा सन्मान केला, त्याबद्दल मला चीड आहे. हॉलिवूडमध्ये परखड भूमिका न घेणाऱ्यांची गर्दी आहे आणि ही घटना म्हणजे खरंच या गोष्टीचे स्पष्ट संकेत आहेत की आता हॉलिवूड हा काही ‘कूल क्लब’ राहिलेला नाही.” क्रिसच्या जागी जिम स्वत: असता तर त्याने काय केलं असतं, या प्रश्नाचं उत्तर देताना तो पुढे म्हणाला, “मी विलविरोधात 20 कोटी डॉलर्सचा खटला दाखल करणार असल्याचं जाहीर केलं असतं, कारण तो व्हिडीओ सोशल मीडियावर कायम राहणार आहे. तो अपमान बऱ्याच कालावधीसाठी तसाच राहणार आहे. जर तुम्हाला गर्दीतून ओरडायचं असेल, ट्विटरवर राग व्यक्त करायचा असेल तर ठीक आहे. पण निवेदकाने काही वक्तव्य केल्याने मंचावर जाऊन त्याला थोबाडीत मारण्याचा अधिकार तुम्हाला नाही.”
घडलेल्या प्रकारावर संताप व्यक्त करत असतानाच विल स्मिथविरोधात कुठलाही राग मनात नसल्याचंही जिमने यावेळी स्पष्ट केलं. “विलच्या मनात कुठलीतरी गोष्ट खूप वेळापासून खुपत असावी, ज्याचं रुपांतर त्या घटनेत झालं असावं. त्याच्याबद्दल माझ्या मनात द्वेष नाही. त्याने खूप चांगली कामं केली आहेत, मात्र ती घटना चांगली नव्हती. त्या रात्री प्रत्येकाच्या आनंदांच्या क्षणांवर ते विरझण टाकणारं होतं. तो स्वार्थी क्षण होता”, असं जिम म्हणाला.
जिम कॅरे हा कॅनेडियन-अमेरिकन अभिनेता, कॉमेडियन, लेखक आणि निर्मात आहे. ‘द ट्रुमन शो’ आणि ‘मॅन ऑन द मून’ या चित्रपटांतील भूमिकांसाठी त्याचं खूप कौतुक झालं. या दोन्ही चित्रपटांसाठी त्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला होता.
निवेदक क्रिस रॉकला कानाखाली मारल्यानंतर अभिनेता विल स्मिथने सोशल मीडियाद्वारे माफीनामा जारी केला आहे. आपली कृती ही लज्जास्पद आणि मर्यादेपलीकडची होती, असं त्याने इन्स्टाग्रामच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
हेही वाचा:
जॅकी श्रॉफ यांच्या मनाची श्रीमंती; निधनाचं वृत्त समजताच घरगड्याच्या घरी सांत्वनाला पोहोचले
“डोकं घरी ठेवून आलात वाटतं”; भर पत्रकार परिषदेत पत्रकारावर चिडला जॉन