Oscars 2024: ऑस्करच्या मंचावर जॉन सिना का आला न्यूड? वेधलं सर्वांचं लक्ष

| Updated on: Mar 11, 2024 | 7:21 AM

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील जॉन सिनाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. कारण ऑस्करच्या मंचावर जॉन विवस्त्र होता. अशा अवस्थेत त्याने एका पुरस्काराची घोषणासुद्धा केली. नेमकं काय घडलं आणि जॉन विवस्त्र का पोहोचले, ते जाणून घेऊयात..

Oscars 2024: ऑस्करच्या मंचावर जॉन सिना का आला न्यूड? वेधलं सर्वांचं लक्ष
जॉन सिना
Image Credit source: Twitter
Follow us on

लॉस एंजिलिस: 11 मार्च 2024 | 96 वा अकॅडमी अवॉर्ड्स अर्थात ऑस्कर पुरस्कार सोहळा लॉस एंजिलिसमधील ‘डॉल्बी थिएटर’मध्ये पार पडत आहे. या पुरस्कार सोहळ्यात कोण कोण बाजी मारणार याकडे जगभरातील कलाकारांचं आणि चाहत्यांचं लक्ष लागून आहे. मात्र या पुरस्कार सोहळ्यातील एका गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. जगप्रसिद्ध रेसलर आणि अभिनेता जॉन सिना ऑस्करच्या मंचावर चक्क विवस्त्र दिसला. विवस्त्र होऊन स्टेजवर आलेल्या जॉनने एका पुरस्काराची घोषणासुद्धा केली.

1974 मध्ये पार पडलेल्या 46 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वांना चकीत करणारी एक घडना घडली होती. डेव्हिड निवेन हे एलिझाबेथ टेलरची ओळख करून देत असताना मंचावरून मागे एक व्यक्ती विवस्त्र धावताना दिसला. ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या इतिहासातील ही सर्वांत चर्चेत असलेली घटना होती. 70 च्या दशकात अशा काही घटना घडल्या होत्या, जेव्हा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये स्ट्रिकिंग करणाऱ्या लोकांनी अनेकांचं लक्ष वेधलं होतं. त्यापैकीच ऑस्कर पुरस्कार सोहळासुद्धा एक होता. याच घटनेचा उल्लेख करत सूत्रसंचालक जिमी किमेलने जॉन सिनाला स्टेजवर विवस्त्र बोलावलं.

हे सुद्धा वाचा

1974 मध्ये ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात घडलेल्या घटनेचा उल्लेख करत सूत्रसंचालक जिमी किमेल उपस्थितांना एक प्रश्न विचारतो. ‘आजच्या घडीला एखादी न्यूड व्यक्ती स्टेजवर अशा पद्धतीने धावू शकेल याची तुम्ही कल्पना तरी करू शकता का’, असा सवाल तो करतो. पुन्हा असं काही होणार असल्याची जणू तो कल्पनाच देत असतो. त्याचवेळी स्टेजच्या एका कोपऱ्यातून जॉन सिना त्याचं डोकं वर काढतो. “मी माझा विचार बदललाय. मला इथे स्ट्रिकर बनायचं नाही”, असं तो जिमीला म्हणतो. त्यावर जिमी त्याला आश्चर्याच्या सुरात म्हणतो, “मला हे काही योग्य वाटत नाही. हा एक शोभिवंत कार्यक्रम आहे आणि त्यात असा वाईट विनोद सुचवल्याबद्दल तुला लाज वाटली पाहिजे.” यावर उत्तर देताना जॉन म्हणतो, “पुरुषाचं शरीर काही विनोद नाही.”

जिमीसोबतच्या संवादानंतर अखेर जॉन सीना मोठ्या लिफाफ्याने प्रायव्हेट पार्ट झाकत स्टेजवर येतो. त्यावेळी उपस्थित जोरजोरात हसू लागतात. जॉनला पुरस्काराच्या विजेत्याची घोषणा करायची असते, मात्र तो लिफाफा उघडू शकत नाही. अखेर पुढच्या सेकंदाला त्याची टीम त्याला कपडे परिधान करते आणि त्यानंतर तो पुरस्कार प्रदान करतो.

यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याशी जॉन सिनाचंही कनेक्शन आहे. कारण तब्बल आठ श्रेणींमध्ये नामांकन मिळवलेल्या ‘बार्बी’ या चित्रपटात तो पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला होता. काही आठवड्यांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीत जॉनने खुलासा केला की त्याच्या एजन्सीने त्याला ‘बार्बी’मध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका न साकारण्याचा सल्ला दिला होता. “मी काही वस्तू नाही. मी एक माणूस आहे आणि मी प्रत्येक संधीच्या आधारेच काम करतो. त्यामुळे मला हीसुद्धा एक संधी वाटली”, असं त्याने स्पष्ट केलं होतं.