‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कॉमेडी शोमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे गौरव मोरे. कॉमेडीची अचूक संधी साधत प्रेक्षकांना मनमुराद हसवणारा गौरव आता एक हिंदी शो गाजवताना दिसतोय. घराघरांत लोकप्रिय झालेला गौरव ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ म्हणून ओळखला जातो. विनोदाचं अचूक टायमिंग साधत गौरवने महाराष्ट्रातील सगळ्याच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आणि आता हिंदीत तो मंच गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून गौरवच्या या धमाकेदार कॉमेडीवर हिंदी प्रेक्षकही खळखळून हसत आहेत आणि तो प्रेक्षकांचं नॉन स्टॉप मनोरंजन करत आहे. सध्या सोशल मीडियावर गौरव आणि अभिनेत्री जुही चावला यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय आणि त्यामागचं कारण देखील तितकंच खास आहे.
गौरवने काही दिवसांपूर्वीच ‘मॅडनेस मचाएंगे’ या हिंदी कार्यक्रमात दणक्यात एन्ट्री घेऊन पहिल्याच भागात जबरदस्त परफॉर्मन्स दिला. गौरवच्या ‘तुफान चक्का’ने जुहीसुद्धा प्रभावित झाली. आता हे नेमकं प्रकरण काय आहे हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या खास एपिसोडमध्ये जुही आणि शाहरुख खान यांच्या ‘डर’ चित्रपटातील गाजलेलं ‘तू है मेरी किरण’ हे गाणं गात गौरव हुबेहूब किंग खानची नक्कल करताना दिसणार आहे. या प्रोमोमध्ये एपिडसोडची झलक पहायला मिळतेय. गौरव जुहीला गुडघ्यावर बसून गुलाबाचं फुल देतो आणि पाकळ्यांची तिच्यावर उधळण करतो.
या खास एपिसोडबद्दल गौरव म्हणाला, “मॅडनेस मचाएंगे हा शो सुरू होऊन अगदीच काही दिवस झाले आहेत आणि हिंदीत एवढा कमालीचा शो करायला मिळणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मराठीच्या सोबतीने हिंदी प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम ही माझ्या कामाची पोचपावती आहे आणि अजून उत्तम काम करण्याची एक प्रेरणा देखील आहे. या शो मध्ये अजून धमाल मज्जा मस्ती करायची आहे. पण जुही चावला मॅमसोबत मला स्टेज शेअर करायला मिळणं हे एक सुख आहे.”
‘मॅडनेस मचाएंगे’ या कार्यक्रमातही गौरवती लोकप्रियता पहायला मिळत आहे. मराठीप्रमाणेच हिंदीतसुद्धा त्याने आपल्या कमाल कामगिरीने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. कॉमेडी शोप्रमाणेच गौरव चित्रपटांमध्येही आपली वेगळी छाप पाडण्यास सज्ज झाला आहे. आगामी ‘अल्याड पल्याड’ या चित्रपटात तो भूमिका साकारणार आहे. याशिवाय ‘महापरिनिर्वाण’ या चित्रपटातही तो महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.