करण जोहर दिग्दर्शित ‘कभी खुशी कभी गम’ हा चित्रपट 2001 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. कौटुंबिक कथानक असलेल्या या चित्रपटात दमदार कलाकारांची फौजच होती. अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, राणी मुखर्जी, हृतिक रोशन, काजोल, करीना कपूर यांसारख्या कलाकारांनी या चित्रपटात विविध भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटातील काही बालकलाकारांनीही प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यापैकीच एक होती ‘लड्डू’ची भूमिका. हृतिक रोशनच्या बालपणाची भूमिका अभिनेता कविश मजुमदारने साकारली होती. आता 23 वर्षांनंतर त्याच कविशला पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. या 23 वर्षांत कविशचा लूक बराच बदलला आहे. त्याला ओळखणंही कठीण झालं आहे.
‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटानंतर कविशने वरुण धवन आणि इलियाना डिक्रूझ यांच्या ‘मैं तेरा हिरो’ या चित्रपटातही भूमिका साकारली होती. याशिवाय त्याने ‘गोरी तेरे प्यार में’ या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. कविशला विनोदी भूमिका साकारायला फार आवडतात. आजही तो थिएटरसाठी काम करतो. कविश आजही भूमिकांसाठी विविध ऑडिशन्स देतो. तो इन्स्टाग्रामवर बऱ्यापैकी सक्रिय असून त्याचे सहा हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर कविश विविध व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत असतो. कविशला इन्स्टाग्रामवर वरुण धवन आणि क्रिकेटर महेंद्र सिंह धोनीची पत्नी साक्षी धोनीसुद्धा फॉलो करतात.
कविशने रितेश देशमुखच्या ‘बँकचोर’ या चित्रपटातही काम केलंय. ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटातील त्याची लड्डूची भूमिका चांगलीच गाजली होती. आता 23 वर्षांनंतर त्याचा बदललेला लूक पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. कविश हा अभिनेता वरुण धवनचा खास मित्र आहे. 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मैं तेरा हिरो’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. कविशचा जन्म 18 जुलै 1995 रोजी झाला. त्याने ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर काम केलं.