मुंबई: अभिनेते कबीर बेदी यांनी काही वर्षांपूर्वी आपल्या मुलाला गमावलं होतं. कबीर यांचा मुलगा सिद्धार्थने आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं होतं. मुलाच्या मृत्यूनंतर ते याप्रकरणी फारसे कधी व्यक्त झाले नव्हते. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी मुलाच्या निधनाबद्दल स्वत:च्या मनात अपराधीपणाची भावना असल्याचं म्हटलं. ‘स्टोरीज आय मस्ट टेल’ या आत्मचरित्राबद्दलही त्यांनी मोकळेपणे भाष्य केलं. 1997 मध्ये कबीर बेदी यांचा मुलगा सिद्धार्थने आत्महत्या केली होती.
सिद्धार्थ हा कबीर बेदी आणि त्यांची पहिली पत्नी प्रोतिमा यांचा मुलगा होता. 1990 मध्ये त्याने कार्नेगी मेलॉन विद्यापीठात शिक्षण घेतलं आणि नंतर त्याला स्किझोफ्रेनिया असल्याचं निदान झालं होतं. वयाच्या 26 व्या वर्षी त्याने आत्महत्या केली होती.
“मी आत्मचरित्रात जे काही लिहिलं, ते मनापासून लिहिलं. आयुष्यात मी ज्या समस्यांचा सामना केला, त्याविषयी त्यात मी लिहिलं आहे. चुकीच्या गुंतवणुकीमुळे माझं खूप मोठं नुकसान झालं होतं. माझा मुलगा ज्यावेळी स्किझोफ्रेनियाचा सामना करत होता, तेव्हाच हे सगळं घडलं. मी माझ्या मुलाला आत्महत्या करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला पण मला त्यात यश मिळालं नाही. माझ्या मनात आजही अपराधीपणाची भावना आहे. त्याचवेळी माझ्यासमोर मोठं आर्थिक संकट होतं. ऑडिशन्सला गेल्यावर तिथे काय करायचं हेच मला कळत नव्हतं. त्यामुळे मी बरेच ऑफर्स गमावले. मी भावनिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालो होतो”, असं ते म्हणाले.
कबीर बेदी यांनी 1971 मध्ये ‘हलचल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 1980 मध्ये त्यांना इटालियन शो ‘सँडोकन’ आणि ऑक्टोपसी यांसारख्या चित्रपटातील भूमिकांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी आणि यश मिळालं.