अभिनेत्री काजोल नेहमीच सोशल मीडियावर चाहत्यांसोबत काही ना काही शेअर करत असते. कधी काही फोटो तर कधी आयुष्यातील काही खास क्षण ती इन्स्टाग्रामवर पोस्ट करते. नुकताच तिने पोस्ट केलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काजोल धडपडताना दिसत आहे. चार वेगवेगळ्या ठिकाणी ती कशा पद्धतीने धडपडली, याचा एकत्रित व्हिडीओ तिने ‘वर्ल्ड लाफ्टर डे’निमित्त पोस्ट केला आहे. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रानेही काजोलच्या व्हिडीओवर कमेंट केली आहे.
‘स्वत:ला पाहिल्यानंतर मला असं जाणवलं की स्टिल कॅमेरासमोर माझं वागणं आश्चर्यकारकरित्या चांगलं राहिलं आहे. थोडं निवांत बसून काही व्हिडीओ पुन्हा एकदा पाहुयात, ज्यांनी लोकांना खूप हसवलं आहे’, असं कॅप्शन देत काजोलने तिचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यातील पहिल्या क्लिपमध्ये काजोल सहजच चालताना पाय घसरून पडल्याचं दिसत आहे. तिच्या आजूबाजूला सुरक्षारक्षक आणि इतर काही लोकं आहेत. तर दुसऱ्या क्लिपमध्ये ती चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान स्टेजवरच धडपडते. यावेळी तिच्या बाजूला उभा असलेला अभिनेता वरुण धवन तिला सावरतो. तिसरी क्लिप ही ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानची आहे. शाहरुखसोबत काजोल सायकल चालवत असते आणि अचानक ती सायकलवरून खाली पडते. चौथा व्हिडीओ हा दुर्गा पूजादरम्यानचा आहे. मंडपात स्टेजवरून खाली उतरताना काजोल तिच्या फोनमध्ये पाहत असते, तेव्हाच ती धडपडते.
काजोलच्या या व्हिडीओवर कमेंट करत मनिष मल्होत्राने लिहिलं, ‘मला अजूनही आठवतंय, जेव्हा मॉरिशसमध्ये तू पडली होती आणि आम्ही सर्वजण तुझ्या दिशेने धावून आलो होतो. तू काही क्षणांसाठी नि:शब्द आणि स्तब्ध झाली होती आणि नंतर आम्ही सर्वजण खूप हसलो. कुछ कुछ होता है या चित्रपटाच्या अशा अनेक आठवणी आहेत. तुला खूप सारं प्रेम.’ काजोलच्या या धडपडणाऱ्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.