मुंबई : अभिनेत्री काजोल तिच्या दमदार अभिनयकौशल्यासोबतच बेधडकपणे मतं मांडण्यासाठी ओळखली जाते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती इंडस्ट्रीमध्ये वाढणारं पापाराझी कल्चर आणि सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यात प्रमाणापेक्षा जास्त केली जाणारी ढवळाढवळ यांविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. सेलिब्रिटी असल्याने फोटोग्राफर्सने त्यांचे फोटो काढणं हा कामाचा एक भाग असला तरी अभिनेते किंवा अभिनेत्रींचा प्रत्येकठिकाणी पाठलाग केला जाऊ नये, असं तिने स्पष्ट केलं. यावेळी काजोलने तिच्यासोबत घडलेल्या एका घटनेचा उल्लेख केला. एका पापाराझीने काजोलच्या कारचा पाठलाग करण्यास सुरुवात केली होती. विशेष म्हणजे त्यावेळी काजोल तिच्या खासगी कामानिमित्त बाहेर जात होती.
बॉलिवूड किंवा टीव्ही इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडीओ पापाराझींकडून क्लिक केले जातात. नंतर हेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केले जातात. या फोटो आणि व्हिडीओंसाठी पापाराझी कॅफे, जिम, एअरपोर्ट, रेस्टॉरंट अशा विविध ठिकाणी सेलिब्रिटींचा पाठलाग करताना दिसतात. काजोलसोबतच तिची मुलगी निसा देवगणलाही पापाराझींकडून फॉलो केलं जातं.
‘मिस मालिनी’ला दिलेल्या मुलाखतीत या पापाराझी कल्चरबद्दल काजोल म्हणाली, “मला असं वाटतं की हे सध्या अती होतंय. हे एखाद्या लोलकासारखं आहे. एकदा का त्याला धक्का लागला की त्याला गती मिळत जाते. पण या सर्व गोष्टी सध्या खूप मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. हे सगळं कुठेतरी कमी व्हायला हवं. कारण शेवटी आम्ही कलाकारच आहोत. हा समतोल राखण्याचा प्रश्न आहे. कधी ना कधी हे सुद्धा नक्कीच ओसरेल.”
“एके दिवशी मी वांद्र्यात होते आणि एका व्यक्तीने माझी कार पाहिली. त्यांनी माझा पाठलाग केला. मी शूटसाठी गेले नव्हते, किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी जात नव्हते किंवा हॉटेलमध्ये जात नव्हते. मी स्टार असल्याने त्यांना असा सवाल करू शकत नव्हते की तुम्ही माझा पाठलाग का करत आहात? कारण मी स्टार आहे आणि अशा गोष्टी घडल्यास मला घाबरण्याचा अधिकार नाही. कारण मी स्टार आहे म्हणून सात ते आठ लोकं हातात कॅमेरा घेऊन माझ्याभोवती घोळका करू शकतात. मग मी कोणत्याही अवतारात असले तरी. मला सतत अलर्ट राहावं लागतं”, असं ती पुढे म्हणाली.
याआधी तापसी पन्नू, जया बच्चन यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी पापाराझी कल्चरवर प्रश्न उपस्थित केला आहे. आलिया भट्ट आणि अनुष्का शर्मा यांनी थेट कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.