सतत वादग्रस्त ट्विट करत चर्चेत राहणारा अभिनेता आणि स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमार आर. खान (Kamaal R Khan) याने एक नवीन ट्विट केलं आहे. या ट्विटद्वारे त्याने मोठी घोषणा केली आहे, ज्यामुळे तो पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वीच केआरकेची (KRK) तुरुंगातून सुटका झाली होती. एका जुन्या वादग्रस्त ट्विटप्रकरणी त्याला अटक झाली होती. जामिनावर सुटल्यानंतर त्याने चित्रपटांचं समिक्षण करणार नसल्याचं जाहीर केलं होतं. आता तो लवकरच अधिकृतरित्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघात (RSS) सहभागी होणार आहे.
केआरकेनं ट्विट करत याबद्दलची माहिती दिली. हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांच्या ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाचा अखेरचा रिव्ह्यू करणार असल्याचं तो म्हणाला. त्याचप्रमाणे लवकरच RSS मध्ये सहभागी होणार असल्याचं जाहीर करत त्याने सर्वांनाच मोठा धक्का दिला.
It’s final and confirmed. Soon, I will go to Nagpur to join #RSS officially.
— KRK (@kamaalrkhan) September 29, 2022
‘हे फायनल झालंय आणि कन्फर्म आहे. मी लवकरच नागपूरला आरएसएस जॉइन करण्यासाठी जाणार आहे’, असं ट्विट त्याने केलंय. त्याच्या या ट्विटवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होतोय.
‘तू मूव्ही रिव्ह्यूच ठीक करतो, तेच कर’, असं एकाने लिहिलं. तर दुसऱ्याने म्हटलं, ‘तिथलाही आम्हाला तुझ्याकडून रिव्ह्यू ऐकायचा आहे.’ एका युजरने तर केआरकेकडे व्लॉगची विनंती केली आहे.
केआरकेनं काही दिवसांपूर्वीच ट्विट करत यापुढे मूव्ही रिव्ह्यू करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. ‘माझ्याकडे फक्त दोनच पर्याय होते. एकतर मी मुंबई सोडावी किंवा मग चित्रपटांचा रिव्ह्यू करणं बंद करावं. मी दुसरा पर्याय निवडला कारण बॉलिवूडमधील लोकांकडे माझ्याविरोधात खोटे केस करण्यासाठी मुंबईत बराच राजकीय पाठिंबा आहे’, असं त्याने म्हटलं होतं.
काही दिवसांपूर्वी केआरकेला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. दहा दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. एका जुन्या वादग्रस्त ट्विटप्रकरणी त्याला अटक झाली होती.