मुंबई: अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र या चित्रपटावरून सुरू असलेला वाद अद्याप शमलेला नाही. आसाममध्ये पठाणविरोधात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी थिएटरबाहेर निदर्शनं केली. त्यानंतर शाहरुखने आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांना फोन करून त्याबद्दल काळजी व्यक्त केली. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच ट्विट करत याबद्दलची माहिती दिली होती. ‘पठाणविरोधात आसाममध्ये सुरू असलेल्या विरोधाबाबत शाहरुखने फोन करून चिंता व्यक्त केली. त्यावर मी याप्रकरणी चौकशी करून योग्य ती कारवाई करणार असल्याचं आश्वासन दिलं’, असं हिमंत बिस्वा सरमा यांनी स्पष्ट केलं. या संपूर्ण प्रकरणावरून आता एका अभिनेत्याने किंग खानवर निशाणा साधला आहे.
‘शाहरुख खानने आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांना मध्यरात्री 2 वाजता फोन केला आणि राज्यात पठाण प्रदर्शित करण्यासाठी मदतीची मागणी केली. एसआरके भाऊ, तू तर म्हणाला होता की तू हवेनं अजिबात डगमगणार नाही. तू तर आता फोनवर भीक मागू लागलास. आता समजलं का की उद्धट होणं किती हानीकारक असतं’, अशी टीका संबंधित अभिनेत्याने शाहरुखवर केली. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून कमाल आर खान आहे.
SRK called Assam CM #HemantaBiswaSarma at 2am and asked for help to release his film #Pathaan in the state. Hahaha SRK Bhai Aap Ne Toh Kaha Tha, Ki Aap Hawa Se Thode Hi Hilne Wale Ho. Aap Toh Phone Par Bheekh Maangne Lage. Ab Pata Chala Ki arrogant Hona Kitna Hanikarak Hai.
— KRK (@kamaalrkhan) January 22, 2023
गुवाहाटीमधील थिएटरबाहेर ‘पठाण’विरोधात निदर्शनं करण्यात आली. यावेळी शाहरुखचे पोस्टरही जाळण्यात आले. याविषयी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांना विचारलं असता ‘कोण शाहरुख खान, मी त्याला ओळखत नाही’ अशी अजब प्रतिक्रिया दिली होती. या प्रतिक्रियेच्या काही तासांनंतर त्यांनी शाहरुखविषयी एक ट्विट केलं. शाहरुखने मध्यरात्री 2 वाजता फोन केल्याचं त्यांनी या ट्विटमध्ये सांगितलं आहे.
Bollywood actor Shri @iamsrk called me and we talked today morning at 2 am. He expressed concern about an incident in Guwahati during screening of his film. I assured him that it’s duty of state govt to maintain law & order. We’ll enquire and ensure no such untoward incidents.
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) January 22, 2023
‘बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने मला फोन केला होता आणि आज पहाटे 2 वाजता आमचं बोलणं झालं. त्याच्या आगामी चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर गुवाहाटीमध्ये घटलेल्या घटनेबद्दल त्याने चिंता व्यक्त केली. कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे राज्य सरकारचं कर्तव्य असल्याचं आश्वासन मी शाहरुखला दिलं. याप्रकरणी चौकशी करून कोणतीही अनुचित घटना घडू नये याची खात्री करू’, असं ट्विट त्यांनी केलं होतं.