मुंबई : टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री काम्या पंजाबीने ‘दहाड’ ही वेब सीरिज पाहिल्यानंतर त्यातील अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या अभिनयावरून निशाणा साधला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत काम्याला एक प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना तिने सोनाक्षीचं नाव न घेता तिच्यावर टीका केली. आपण जाणूनबुजून ओटीटी विश्वापासून दूर का आहोत, याविषयीही तिने या मुलाखतीत सांगितलं. त्याचसोबत अभिनेता एजाज खानच्या कमेंटवरही काम्याने प्रतिक्रिया दिली. काम्या पंजाबी ही गेल्या दोन दशकांपासून इंडस्ट्रीत काम करतेय. मात्र ओटीटीवर तिने अद्याप काम केलं नाही.
काम्या म्हणाली, “मी अशा प्रकारची व्यक्ती नाही जी म्हणेल की अरे मला चित्रपटात काम करायचं आहे किंवा ओटीटीवर काम करायचं आहे. मला टेलिव्हिजन जास्त आवडतं आणि त्यालाच माझं प्राधान्य असेल. टेलिव्हिजन हे माझं पहिलं प्रेम आहे आणि तिथे काम करताना मी खूप खुश असते.”
काम्याने पुढे असंही सांगितलं की कितीतरी ओटीटी कलाकारांना अभिनय चांगलं जमत नाही. तिने नाव न घेता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका वेब सीरिजचं उदाहरण दिलं. ती म्हणाली, “एका मोठ्या अभिनेत्याच्या मुलीने या सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण केलं आहे. मात्र जेव्हा मी सीरिज बघायला सुरुवात केली तेव्हा त्या अभिनेत्रीला नीट अभिनयसुद्धा करता येत नव्हतं. यामुळे मी सीरिज पहिल्या एपिसोडपलीकडे पाहूच शकले नाही.” काम्याने नाव घेतलं नसलं तरी तिचा इशारा हा अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाकडे होता, असा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत. कारण सोनाक्षीने नुकतंच ‘दहाड’ या वेब सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण केलं आहे.
काम्याने निर्माते आणि कास्टिंग डायरेक्टर्सच्या निवड प्रक्रियेबद्दलही प्रश्न उपस्थित केला. ज्या कलाकारांना अभिनयसुद्धा नीट करता येत नाही, अशा कलाकारांना काम का देतात, असा सवाल तिने केला. “ही अत्यंत दु:खद परिस्थिती आहे. फक्त मोठी नावं ओटीटीवर काम करतील ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. निर्माते मोठमोठ्या सेलिब्रिटींना, स्टारकिड्सना, प्रस्थापित कलाकारांना यासाठी कास्ट करत आहेत, कारण त्यांचा प्रोजेक्ट विकला जावा किंवा त्याची दखल घेतली जावी असं त्यांना वाटतं. पण मग यात प्रतिभेला कुठे महत्त्व आहे”, असं ती पुढे म्हणाली.