आपल्या दमदार अभिनयासाठी आणि बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाणारी बॉलिवूडची ‘क्वीन’ अर्थात अभिनेत्री कंगना राणौत लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. भारतीय जनता पार्टीकडून तिला हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघाचं तिकिट मिळालं आहे. राजकारणात प्रवेश केल्यापासून कंगना तिचा आणि तिच्या पक्षाचा जोरदार प्रचार करत आहे. यासाठी ती विविध मुलाखतीसुद्धा देत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगनाने तिचा मोठा निर्णय जाहीर केला आहे. मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यास बॉलिवूड सोडणार का, असा प्रश्न कंगनाला विचारण्यात आला होता. त्यावर तिने होकारार्थी उत्तर दिलंय.
‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाली, “हे चित्रपटांचं विश्व खोटं आहे आणि तिथली प्रत्येक गोष्ट बनावट आहे. ते खूप वेगळं वातावरण तयार करतात. पाण्याच्या खोट्या बुडबुड्याप्रमाणे ते चकमकीत विश्व निर्माण करतात आणि त्यामुळे प्रेक्षक त्यांच्याकडे आकर्षित होतात. पण हेच सत्य आहे.” यापुढे कंगनाला विचारण्यात आलं की ती बॉलिवूड आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांमध्ये समतोल साधणार का? त्यावर ती पुढे म्हणाली, “मी खूप उत्साही व्यक्ती आहे. मला नोकरी करावी लागेल म्हणून मी कधी केली नाही. चित्रपटसृष्टीतही मी लिहिण्यास सुरुवात केली आहे. जेव्हा मी भूमिका साकारून कंटाळले, तेव्हा दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. त्यामुळे माझं मन वेगळ्या प्रकारे काम करू लागतं आणि मला आवडीने काम करायला आवडतं.”
खरंतर एखाद्या व्यक्तीने एकाच करिअरमध्ये पुढे मार्गक्रमण करत राहावं, असंही मत तिने यावेळी मांडलं. कंगनाच्या बॉलिवूड सोडण्याच्या निर्णयाबाबत खूप लोक नाराज होतील, असं म्हटल्यावर तिने सांगितलं, “होय. मला अनेक दिग्दर्शक म्हणतात की आमच्याकडे एक चांगली हिरोइन आहे. तुम्ही ही इंडस्ट्री सोडून जाऊ नका. मी अभिनय चांगला करते, पण ठीक आहे, ते सुद्धा एकप्रकारे कौतुक झालं. मी त्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहते.”
राजकारणाशिवाय कंगनाच्या हातात सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहेत. तिचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र निवडणुकांमुळे त्याचं प्रदर्शन लांबणीवर ढकलण्यात आलं आहे. याशिवाय ‘सीता: द इन्कार्नेशन’ हा चित्रपटसुद्धा प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे. आर. माधवनसोबत एका थ्रिलर चित्रपटावरही ती काम करतेय.