भारत-बांग्लादेश वादाचा कंगना यांच्या ‘इमर्जन्सी’वर निघाला राग

| Updated on: Jan 15, 2025 | 1:02 PM

कंगना राणौत यांच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत बांग्लादेशने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यातील वादाचा राग कंगना यांच्या चित्रपटावर निघाल्याचं म्हटलं जात आहे. हा चित्रपट 17 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.

भारत-बांग्लादेश वादाचा कंगना यांच्या इमर्जन्सीवर निघाला राग
इमर्जन्सी या चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही दृश्ये
Image Credit source: Youtube
Follow us on

अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट अनेक अडथळ्यांनंतर अखेर येत्या 17 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र आता या चित्रपटावर बांग्लादेशमध्ये बंदी घातल्याची माहिती समोर येत आहे. भारत आणि बांग्लादेशमधील तणावपूर्ण संबंध यामागचं प्राथमिक कारण असल्याचं कळतंय. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1975 मध्ये जाहीर केलेल्या आणीबाणीच्या परिस्थितीवर या चित्रपटाची कथा आधारित आहे. यामध्ये कंगना यांच्यासोबतच अनुपम खेर, श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण, विशाक नायर, सतिश कौशिक, महिमा चौधरी यांच्याही भूमिका आहेत.

या प्रकरणाशी संबंधित एका सूत्राने सांगितलं की, “भारत आणि बांग्लादेशमधील संबंध सध्या तणावपूर्ण आहेत. म्हणूनच तिथे या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. या चित्रपटात नेमकं काय दाखवलंय याच्याशी त्याचा फारसा काही संबंध नाही. मात्र दोन्ही देशांमधील चालू राजकीय घडामोडींमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.” बांग्लादेशच्या 1971 च्या स्वातंत्र्ययुद्धात भारताने कोणती भूमिका बजावली, बांग्लादेशचे जनक शेख मुजीबूर रेहमान यांना भारताने कसा पाठिंबा दिला यासंदर्भातील घडामोडीही कंगना यांच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत. त्याचसोबत बांग्लादेशी अतिरेक्यांच्या हातून रेहमान यांची हत्या झाल्याचंही चित्रण त्यात दाखवलंय. यामुळेही चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातल्याचं म्हटलं जात आहे.

कंगना यांचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट 6 सप्टेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र सेन्सॉर बोर्डाकडून हिरवा कंदिल न मिळाल्याने या चित्रपटाच्या प्रदर्शनात अनेक अडथळे आले. अखेर सेन्सॉर बोर्डाने काही सीन्स आणि डायलॉग्सवर कात्री चालवल्यानंतर हा चित्रपट येत्या 17 जानेवारी रोजी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.

हे सुद्धा वाचा

‘इमर्जन्सी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी त्याच्या स्पेशल स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्क्रिनिंगला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होती. कंगना यांचा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली होती. “मी देशातील आणीबाणीचा साक्षीदार आहे. कंगना यांनी आज जनतेसमोर मांडलेला आणीबाणीचा इतिहास खरा आहे. मला पूर्ण विश्वास आहे की या चित्रपटाला जनतेचाही पाठिंबा मिळेल,” असं ते म्हणाले होते.