मुंबई: अभिनेत्री कंगना रनौतच्या आगामी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचं शूटिंग नुकतंच पूर्ण झालं. यानिमित्त बुधवारी तिच्या टीमकडून पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. इमर्जन्सी या चित्रपटात कंगना ही दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटासाठी कंगनाने तिची सर्व संपत्ती गहाण ठेवल्याचा खुलासा केला आहे. इमर्जन्सी या चित्रपटाच्या शूटिंगचा प्रवास काही सोपा नव्हता, असं ती म्हणाली. देशातील विविध भागांमध्ये या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं. तिच या चित्रपटाची निर्मातीसुद्धा असल्याने तिला चित्रपट पूर्ण करण्यासाठी संपत्ती गहाण ठेवावी लागली, असं कंगनाने सांगितलं.
“मी एखादा निर्धार केला तर ते काम पूर्णत्वास नेते. माझ्यासाठी काही मोठी गोष्ट नाही. एका मिनिटात मी एखादा निर्णय घेते. मात्र शूटिंगदरम्यान बँकांमध्ये जाणं, संपत्तीचा हिशोब करून किती खर्च करणं ते ठरवणं या गोष्टी किचकट होत्या. कारण त्यामुळे शूटिंगसुद्धा रखडली होती. माझ्यासाठी हे जरा अवघड होतं. मात्र एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी मला जर काही गोष्टी सोडाव्या लागल्या किंवा गहाण ठेवाव्या लागल्या तर माझ्यासाठी ती काही मोठी बाब नाही”, असं कंगना म्हणाली.
“मी या शहरात फक्त 500 रुपये घेऊन आले होते. पुन्हा जर मी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले तर मी स्वत:ला पुन्हा खंबीरपणे उभी करू शकते. माझ्यात तेवढा आत्मविश्वास आणि हिंमत आहे. माझ्यासाठी संपत्तीचं फार महत्त्व नाही”, असंही ती आत्मविश्वासाने म्हणाली.
ट्विटरवर परतल्यानंतर कंगना तिच्या विविध ट्विट्समुळेही चर्चेत आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’च्या कमाईवरून टोमणा मारणाऱ्या एका युजरला कंगनाने सडेतोड उत्तर दिलं. यावेळीसुद्धा तिने संपत्ती गहाण ठेवल्याचा उल्लेख केला.
‘पठाणची एका दिवसाची कमाई ही तुझ्या आयुष्यभरातील कमाईपेक्षा जास्त आहे’, असं ट्विट एका युजरने केलं. त्यावर उत्तर देताना कंगनाने लिहिलं, ‘भावा, माझ्याकडे काहीच कमाई उरली नाही. फक्त एक चित्रपट पूर्ण करण्यासाठी मी माझं घर, माझं ऑफिस आणि सर्वकाही गहाण ठेवलं आहे. देशाच्या संविधानाचा जल्लोष आणि देशाप्रती असलेलं आमचं प्रेम साजरा करणारा हा चित्रपट आहे. पैशे तर सर्वजण कमावू शकतात, पण असं उधळणारा कोणी आहे का?’
कंगनाने 2006 मध्ये ‘गँगस्टर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अनुराग बासू दिग्दर्शित या चित्रपटात कंगनासोबत इमरान हाश्मीने भूमिका साकारली होती. कंगनाच्या आगामी इमर्जन्सी या चित्रपटात तिच्यासोबत अनुपम खेर, महिमा चौधरी, मिलिंद सोमण, सतीश कौशिक, श्रेयस तळपदे यांच्याही भूमिका आहेत.