बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना राणौत लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. हिमाचल प्रदेशमधील मंडी या मतदारसंघातून ती भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहे. तिकिट मिळाल्यापासून कंगना विविध कारणांमुळे सतत चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला राजकारणात येण्यामागचं कारण विचारण्यात आलं. सतत चित्रपट फ्लॉप होत असल्याने राजकारणात येण्याचा निर्णय घेतला का, असा प्रश्न कंगनाला विचारण्यात आला. त्यावर तिने उत्तर दिलं आहे. हे उत्तर देताना तिने शाहरुख खानचं उदाहरण दिलं आहे. 2023 मध्ये ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ हे तीन हिट चित्रपट देण्यापूर्वी त्यालासुद्धा फ्लॉप चित्रपटांना सामोरं जावं लागलं होतं, असं ती म्हणाली.
‘टाइम्स नाऊ समिट’मध्ये बोलताना कंगना म्हणाली, “या जगात असा कोणताच अभिनेता नाही ज्याचा एकही चित्रपट फ्लॉप झाला नसेल. गेल्या दहा वर्षांत शाहरुखला हिट चित्रपट देता आला नाही. पण तेव्हा त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटाने कमाल केली. मला सात-आठ वर्षांत हिट चित्रपट देता आला नाही. पण तेव्हा ‘क्वीन’ला बॉक्स ऑफिसवर यश मिळालं. त्यानंतर पुन्हा तीन-चार वर्षे माझी चित्रपटे चालली नाहीत. मग ‘मणिकर्णिका’ने कमाल केली. आता ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकेल अशी अपेक्षा आहे.”
कंगनाने ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्यात तिने दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट येत्या 14 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये कंगनासोबत अनुपम खेर, श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण आणि इतर कलाकारांच्याही भूमिका आहेत. ओटीटीचं वर्चस्व वाढत असल्याने सध्याच्या घडीला स्टार होणं सोपं नसल्याचं मत तिने यावेळी मांडलं.
“सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे कलाकारांना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी अनेक संधी मिळत आहेत. मात्र ओटीटी प्लॅटफॉर्मने अद्याप कोणता स्टार दिलेला नाही. आमची स्टार्सची शेवटची पिढी आहे. आम्ही प्रसिद्ध आहोत आणि देवाच्या कृपेने आम्हाला कामसुद्धा मिळतंय. त्यामुळे फ्लॉप चित्रपटांमुळे मी राजकारणाकडे वळले, असं काही नाही. पण मला फक्त कलेच्या क्षेत्राचा वापर न करता वास्तविक जगाशी स्वत:ला गुंतवून घ्यायचं आहे”, असं ती पुढे म्हणाली. कंगना राणौतचे ‘तेजस’, ‘धाकड’ आणि ‘थलायवी’ हे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटले.