बॉलिवूडची ‘क्वीन’ अर्थात अभिनेत्री कंगना राणौत आता खासदार झाल्या आहेत. राजकारणात पाऊल ठेवताच कंगना यांना भारतीय जनता पार्टीकडून लोकसभा निवडणुकीचं तिकिट मिळालं आणि त्या मंडी या मतदारसंघातून विजयी झाल्या. या मतदारसंघात कंगनाच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह उभे होते. कंगनाने त्यांचा जवळपास 74 मतांनी पराभव केला आणि राजकारणाची आपल्या प्रवासाची सुरुवात केली. विजयानंतर 9 जून रोजी राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीला कंगना यांची उपस्थिती पहायला मिळाली. आता कंगना यांना सतत संसदेत पाहिलं जाणार आहे. खासदार बनल्यानंतर त्यांचं संसदेत सतत येणं-जाणं असेल. खासदार बनलेल्या कंगना यांनासुद्धा इतर खासदारांना ज्या सुविधा मिळतात, त्या सर्व दिल्या जातील.
कंगना यांना दर महिन्याला भत्ता म्हणून 70 हजार रुपये मिळतील. तर ऑफिस खर्च दर महिना 60 हजार रुपये दिले जातील. यामध्ये स्टेशनरी, कर्मचाऱ्यांचा पगार आणि इतर वस्तूंच्या खर्चाचा समावेश असेल. तर कंगना यांचा पगार एक लाख रुपये दर महिना असेल. इतर खासदारांप्रमाणेच कंगना यांनाही मोफत हाय-स्पीड इंटरनेटशिवाय दरवर्षी 1.5 लाख रुपयांपर्यंत मोफत टेलिफोन कॉल सुविधा मिळेल. याशिवाय दरवर्षी त्यांना 4 हजार लीटर पाणी आणि 50 हजार युनिट मोफत विजेची सुविधासुद्धा दिली जाईल. कंगना यांना एक मोफत घरसुद्धा मिळेल. जर त्या या घरात राहत नसतील तर दोन लाख रुपये दर महिन्याला भत्ता म्हणून घेऊ शकतात.
या सर्व गोष्टींशिवाय कंगना राणौत यांना दरवर्षी 34 वेळा विमानप्रवास मोफत असेल. इतकंच नव्हे तर प्रत्येक दिवशी इतर खर्चांसाठी त्यांना दोन हजार रुपये दिले जातील. कंगना यांना भारत सरकारतर्फे मोफत मेडीकल सुविधासुद्धा दिल्या जातील. कंगना यांनी आतापर्यंत बॉलिवूड इंडस्ट्रीत अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. ‘क्वीन’ या चित्रपटातील जबरदस्त अभिनयामुळे त्या ‘बॉलिवूडची क्वीन’ म्हणूनही ओळखल्या जाऊ लागल्या. कंगना या नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थक राहिल्या आहेत. यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि मंडी या मतदारसंघातून निवडणूक लढवली. पहिल्याच प्रयत्नात कंगना यांचा विजय झाला.