भारताच्या विनेश फोगटने ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला कुस्तीगीर होण्याचा मान मिळवला आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील 50 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत विनेशने मंगळवारी क्यूबाच्या पॅन अमेरिकन विजेत्या युस्नेलिस गुझमान लोपेझचा एकतर्फी लढतीत गुणांवर 5-0 असा पराभव केला. विनेशच्या कामगिरीने भारताचं स्पर्धेतील चौथं पदक निश्चित झालं आहे. कमालीच्या आत्मविश्वासाने मॅटवर उतरलेल्या विनेशची देहबोली तिन्ही लढतीत अतिशय सकारात्मक होती. या विजयानंतर संपूर्ण देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांनी विनेशच्या विजयानंतर लिहिलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित विनेशला शुभेच्छा तर दिल्याच, पण तिने तिच्याच अंदाजात कुस्तीगीरांच्या आंदोलनावरून टोमणाही मारला आहे.
कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये विनेश फोगटचा फोटो पोस्ट केला. त्यावर तिने लिहिलं, ‘भारताच्या पहिल्या सुवर्णपदकाची आशा आहे. विनेश फोगटने एकेकाळी कुस्तीगीरांच्या आंदोलनात भाग घेतला होता आणि तिथे तिने ‘मोदी तेरी कब्र खुदेगी’च्या घोषणा दिल्या होत्या. तरीसुद्धा तिला देशाचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी, सर्वोत्तम प्रशिक्षण, प्रशिक्षक आणि सोयीसुविधा देण्यात आल्या. लोकशाहीची आणि महान नेत्याचं हे सौंदर्य आहे.’
गेल्या वर्षी कुस्तीपटूंनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवला होता. कुस्ती संघाचे अध्यक्ष ब्रजभूषण शरण यांच्यावर आरोप करण्यात आला होता की त्यांनी सहा महिला कुस्तीगीरांचं शोषण केलं आहे. कुस्तीपटूंनी या मुद्द्यावरून जोरदार आंदोलन आणि निदर्शनं केली होती. त्यावेळी विनेश फोगटने तिचे सर्व मेडल्स आणि पुरस्कार आणून रस्त्यावर ठेवले होते. तिने वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य न झाल्याने तिने मोदींविरोधात घोषणाबाजीही केली होती.
पहिल्या 2016 रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत 48 किलो वजनी गटातून खेळताना विनेशला दुखापतीचा सामना करावा लागला होता. त्यानंतर 2020 टोक्यो स्पर्धेत विनेश 53 किलो वजनी गटात नवव्या स्थानावर राहिली होती. मानसिक दडपण आणि स्पर्धेदरम्यान झालेल्या अंतर्गत कलहाचा विनेशच्या कामगिरीवर परिणाम झाला होता. यंदा तयारीपासूनच विनेशला संघर्ष करावा लागला होता. मॅटबाहेरील अस्तित्वाची लढाई लढत असतानाच विनेशने वजनी गट बदलावं लागल्याचं आव्हानही लिलया पेललं.