भाजपने हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री कंगना राणौतला उमेदवारी दिली आहे. कंगना नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असते. 2020 मध्ये तिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकरवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. उर्मिलाला तिने सॉफ्ट पॉर्नस्टार म्हटलं होतं. तिच्या या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावर आता कंगनाने आणखी एक वक्तव्य केलं असून तिच्यावर पुन्हा एकदा टीका होऊ लागली आहे. कंगनाने आता तिच्या पॉर्न स्टारच्या वक्तव्यावरून स्पष्टीकरण देताना अभिनेत्री सनी लिओनीचा उल्लेख केला आहे.
उर्मिलाने तिच्या एका मुलाखतीत माझ्या संघर्षाची खिल्ली उडवली होती, असा आरोप करत कंगनाने तिला सॉफ्ट पॉर्नस्टार म्हटलं होतं. निवडणुकीचं तिकिट मिळवण्यासाठी उर्मिला भाजपची मनधरणी करण्याचा प्रयत्न करतेय. जर तिला तिकिट मिळू शकतं तर मला का नाही, असा सवाल कंगनाने केला होता. यावरून सोशल मीडियावर प्रचंड टीका झाली होती. आता कंगना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात असताना तिचं जुनं वक्तव्य पुन्हा व्हायरल होऊ लागलं आहे.
“भाजपचं तिकिट मिळवणं माझ्यासाठी कठीण नाही. उर्मिला सॉफ्ट पॉर्न स्टार आहे. प्रत्येकाला माहिती आहे, ती तिच्या अभिनयामुळे नाही तर कोणत्या गोष्टीमुळे प्रसिद्ध आहे? जर तिला तिकिट मिळू शकतं, तर मला का नाही,” असं म्हणत कंगनाने उर्मिलावर निशाणा साधला होता.
‘टाइम्स नाऊ समिट’मध्ये कंगनाने यावरून म्हटलंय, “सॉफ्ट पॉर्नस्टार हा आक्षेपार्ह शब्द आहे का? यात काहीच आक्षेपार्ह नाही. फक्त हा एक असा शब्द आहे जो सामाजिक रुपात अस्वीकार्य आहे. आपल्या देशात पॉर्नस्टारचा जितका आदर केला जातो, तितका कोणाचाच केला जात नाही. सनी लिओनीला जाऊन विचारा.” कंगनाच्या या वक्तव्यावरून पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे कंगनाला उमेदवारी दिल्यानंतर एकमेकांशी भांडणारे काँग्रेसचे नेते एकत्र आले आहेत. इतकंच नव्हे तर हिमाचल प्रदेशातील दोन मोठ्या राजघराण्यांचीही कंगनाविरोधात छुपी एकजून होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.