‘हा कला अन् कलाकारांचा छळ..’; ‘इमर्जन्सी’वर पंजाबमधील बंदीनंतर संतापल्या कंगना राणौत

| Updated on: Jan 17, 2025 | 2:06 PM

अनेक अडथळ्यांनंतर अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट अखेर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. मात्र पंजाबमधील अनेक थिएटर्समध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. यावरून कंगना यांनी संताप व्यक्त केला आहे.

हा कला अन् कलाकारांचा छळ..; इमर्जन्सीवर पंजाबमधील बंदीनंतर संतापल्या कंगना राणौत
Kangana Ranaut in Emergency Movie
Image Credit source: Instagram
Follow us on

अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत यांचा ‘इमर्जन्सी’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट अखेर आज (17 जानेवारी) थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला आहे. मात्र पंजाबमधील अनेक थिएटरमध्ये या चित्रपटाचे शोज रद्द करण्यात आले आहेत. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीसह (SGPC) शीख संघटनांनी या चित्रपटाचा निषेध केला आहे. हा चित्रपट पंजाबमध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली होती. त्यानंतर एसजीपीसीने मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडे पंजाबमध्ये ‘इमर्जन्सी’च्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली होती.

कंगना राणौत यांची पोस्ट-

‘हा पूर्णपणे कला आणि कलाकारांचा छळ आहे. पंजाबमधील अनेक शहरांमधून असं वृत्त समोर येतंय की ही लोकं ‘इमर्जन्सी’ चित्रपट प्रदर्शित होऊ देत नाहीयेत. मला सर्व धर्मांबद्दल अत्यंत आदर आहे आणि चंदीगडमध्ये शिक्षण घेतल्यानंतर, लहानाची मोठी झाल्यानंतर मी शीख धर्माचं बारकाईने निरीक्षण केलंय. त्या धर्माचं मी पालन केलंय. हे पूर्णपणे खोटं आहे आणि माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी, माझ्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाला हानी पोहोचवण्यासाठी असा प्रचार केला जातोय,’ असं कंगना यांनी लिहिलंय.

हे सुद्धा वाचा

अमृतसर, बर्नाला, मानसा, मोगा आणि पटियाला या जिल्ह्यांमध्ये ‘इमर्जन्सी’चं प्रदर्शन थांबवण्यात आलं आहे. अमृतसरमधील सर्व थिएटर्समध्ये या चित्रपटाचं प्रदर्शन रोखण्यात आल्याचं शीख कार्यकर्ते परमजीत सिंग अकाली यांनी सांगितलं. “थिएटर मालकांनी शीख समुदायाच्या भावना समजून चित्रपट प्रदर्शित न करण्याचं मान्य केलंय”, असं ते म्हणाले. सिमरनजीत सिंग मान यांच्या नेतृत्वाखालील शिरोमणी अकाली दलनेही (अमृतसर) या चित्रपटाला विरोध केला आहे. याआधी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात एसजीपीसीचे अध्यक्ष हरजिंदर सिंग धामी म्हणाले, “हा चित्रपट म्हणजे इतिहासाचं विकृतीकरण करण्याचा आणि शीख धर्मीयांच्या भावना दुखावण्याचा एक सुनियोजित प्रयत्न आहे. हा चित्रपट प्रदर्शित केल्यास शीख समुदायात संताप निर्माण होऊ शकतो.”

कंगना राणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाची कथा भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1975 मध्ये जाहीर केलेल्या आणीबाणीच्या परिस्थितीवर आधारित आहे. यामध्ये कंगना यांच्यासोबतच अनुपम खेर, श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण, विशाक नायर, सतिश कौशिक, महिमा चौधरी यांच्याही भूमिका आहेत.