शेतकऱ्याच्या मुलीने गाल लाल केला तर.. कंगनाला मारणाऱ्या CISF महिलेचं कोणाकडून कौतुक?

| Updated on: Jun 07, 2024 | 2:24 PM

चंदीगड विमानतळावर भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौतला एका महिला सीआयएसएफ कॉन्स्टेबलने कानाखाली मारली. या घटनेबाबत विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. काहींनी या घटनेला विरोध केला तर काहीजण कंगनावर निशाणा साधत आहेत.

शेतकऱ्याच्या मुलीने गाल लाल केला तर.. कंगनाला मारणाऱ्या CISF महिलेचं कोणाकडून कौतुक?
Kangana Ranaut slapped by CISF security
Image Credit source: Instagram
Follow us on

हिमाचल प्रदेशमधील मंडी या मतदारसंघातून विजयी झालेली भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौतला कानाखाली मारल्याचं प्रकरण जोरदार चर्चेत आहे. यात काहीजण कंगनाची बाजू घेत आहेत तर काहीजण कंगनाला कानाखाली मारणाऱ्या सीआयएसएफ कॉन्स्टेबलचं समर्थन करत आहेत. आता ऑलिम्पिक पदक जिंकलेला रेसलर बजरंग पुनियाने महिला कॉन्स्टेबलचं कौतुक केलं आहे. बजरंगने याप्रकरणी ट्विट केलं आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) एका महिला कॉन्स्टेबलने गुरुवारी चंदीगड विमानतळावर कंगनाच्या कानशिलात लगावली. जेव्हा कंगनाने तिला विचारलं की असं का केलंस? तेव्हा तिने शेतकरी आंदोलनाची समर्थक असल्याचं सांगितलं. कंगनाने शेतकरी आंदोलनाबद्दल टिप्पणी केली होती. ‘100-100 रुपये घेऊन ते तिथे बसतात’, असं ती म्हणाली होती. याच टिप्पणीचा राग मनात ठेवून संबंधित कॉन्स्टेबलने कंगनाच्या कानाखाली मारली. त्यावर आता विविध प्रतिक्रिया येत आहेत.

ऑलिम्पिक पदक जिंकणारा हरयाणाचा रेसलर बजरंग पुनियाने ट्विट करत नैतिकतेबद्दल बोलणाऱ्यांना प्रश्न विचारला आहे. त्याने लिहिलं, ‘जेव्हा महिला शेतकऱ्यांविषयी बरंवाईट बोललं जात होतं, तेव्हा ही नैतिकता शिकवणारे लोक कुठे होते? आता त्या शेतकरी आईच्या मुलीने गाल लाल केला तर शांतीची शिकवण द्यायला पुढे आले. सरकारच्या अत्याचाराने शेतकरी मारले गेले, त्यावेळी ही शांतीची शिकवण सरकारला द्यायला पाहिजे होती.’ या पोस्टच्या शेवटी त्याने एक शायरीसुद्धा लिहिली आहे. ‘घटाएं उठती है बरसात होने लगती है, जब आंख भर के फलक को किसान देखता है’, अशी शायरी त्याने लिहिली आहे.

हे सुद्धा वाचा

बजरंग पुनियाने महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनात भाग घेतला होता. त्याचसोबत शेतकरी आंदोलनातही तो दिसला होता. बजरंगने याआधीही शेतकरी आंदोलनाचं समर्थन केलं आहे. या घटनेनंतर संबंधित महिला कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आलं असून तिच्याविरुद्ध एफआयआर नोंदण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

अधिकाऱ्याने सांगितलं की कंगना विमानामध्ये चढण्यापूर्वी विमानतळावरील सुरक्षा तपासणीदरम्यान सीआयएसएफ कॉन्स्टेबलने अभिनेत्रीला कथितपणे थप्पड मारली. त्यानंतर कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडीओ पोस्ट करून घडलेल्या घडनेविषयी सांगितलं. या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीसुद्धा प्रतिक्रिया दिली. “कॉन्स्टेबलने तिच्या आईसाठी कायदा घेतला. मात्र एका खासदारावर अशा पद्धतीने हाच उचलणं योग्य नाही”, असं ते म्हणाले.