उदयपूर : बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना रनौत आज तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त कंगनाने उदयपूरमधील श्रीनाथजींचं दर्शन घेतलं. यावेळी मनसेचे ‘मसल मॅन’ मनीष धुरी हेसुद्धा तिच्यासोबत होते. कंगनाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने तिचे कुटुंबीय, गुरू आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत. याचसोबत तिने अशा लोकांचेही आभार मानले आहेत, जे तिला ट्रोल करतात.
कंगना तिच्या दमदार अभिनयासोबतच बेधडक अंदाजासाठी ओळखली जाते. सामाजिक मुद्दे असो किंवा राजकीय.. कंगना नेहमीच मनमोकळेपणे तिची मतं मांडते. अनेकदा यामुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. मात्र कंगनाने याआधीही स्पष्ट केलंय की तिला ट्रोलिंगने काहीच फरक पडत नाही. उलट त्याच गोष्टीमुळे तिला प्रगती करण्यास मदत होते.
वाढदिवसानिमित्त कंगना रनौतने तिच्या टीकाकारांसाठी खास मेसेज शेअर केला आहे. “जन्मदिनी मी माझ्या आई-वडिलांचे आभार मानते. माझे आई-वडील, माझी कुलदेवी अंबिकाजी, माझे सर्व गुरू श्री सदगुरूजी, स्वामी विवेकानंदजी, माझे प्रशंसक, शुभचिंतक, जे लोक माझ्यासोबत काम करतात आणि माझे चाहते.. या सर्वांचं मी आभार मानते”, असं ती म्हणाली.
या व्हिडीओत ती पुढे म्हणते, “माझे शत्रू ज्यांनी आजपर्यंत मला कधी आराम करू दिलं नाही. मला कितीही यश मिळालं तरी मला लढायला शिकवलं, संघर्ष करायला शिकवलं, त्यांचीसुद्धा मी कायम आभारी राहीन. मित्रांनो, माझी विचारसरणी खूप सरळ आहे. आचारण आणि विचारसुद्धा खूप साधे आहेत. मी नेहमीच इतरांसाठी चांगला विचार करते. त्यामुळे जर देशहितासाठी मी काही म्हटलं असेन किंवा कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्यासाठी मी माफी मागते. श्रीकृष्णाच्या कृपेनं मला चांगलं जीनव मिळालं आहे. माझ्या मनात कोणाबद्दल कटुता नाही.”
कंगनाने वयाच्या 16 व्या वर्षी मॉडेलिंग विश्वात पदार्पण केलं. ‘गँगस्टर’ या पहिल्याच चित्रपटात तिने दमदार अभिनयाने आपली वेगळी छाप सोडली. 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातून कंगनाने सिद्ध केलं की ती इंडस्ट्रीत काहीतरी वेगळं करण्यासाठी आली आहे. ‘क्वीन’, ‘फॅशन’, ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘तनु वेड्स मनु’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत.