कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता दर्शन थुगूदीपाला नुकतंच पोलिसांनी एका हत्येप्रकरणी अटक केली. 33 वर्षीय रेणुकास्वामीच्या हत्येप्रकरणी ही कारवाई झाली आहे. दर्शनसोबत कथितपणे रिलेशनशिपमध्ये असलेली अभिनेत्री पवित्रा गौडाला रेणुकास्वामीने अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप आहे. याच नाराजीतून दर्शनने त्याच्या हत्येची सुपारी दिली. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पवित्रासह 16 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शन सतत मारेकऱ्यांच्या संपर्कात होता आणि रेणुकास्वामीचं अपहरण करून सर्वांत आधी त्याच्याकडेच नेण्यात आलं होतं. आता रेणुकास्वामीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे.
रेणुकास्वामीच्या हत्येआधी त्याला इलेक्ट्रिक शॉक देऊन टॉर्चर करण्यात आलं होतं, असं पोलिसांनी सांगितलंय. पोलिसांनी नुकतंच याप्रकरणी धनराज नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे, जो केबल वर्कर आहे. धनराजने पोलिसांना सांगितलं की या प्रकरणातील आणखी एक आरोपी नंदीशने त्याला बेंगळुरूच्या एका गोडाऊनमध्ये बोलावलं, जिथे त्यांनी रेणुकास्वामीला शॉक देण्यासाठी एका उपकरणाचा वापर केला होता. पोलिसांनी ते उपकरणसुद्धा जप्त केलं आहे.
आरोपींनी सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास रेणुकास्वामीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली होती. रेणुकास्वामी ऑटोरिक्षामधून प्रवास करत होता आणि दर्शनने सुपारी दिलेला माणूस त्याचा पाठलाग स्कूटरवरून करत होता. रेणुकास्वामीच्या अपहरणासाठी वापरलेली कारसुद्धा पोलिसांनी रविवारी जप्त केली. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, ही कार चित्रदुर्ग जिल्ह्यातील अय्यनहल्ली गावातील एका घराबाहेर उभी होती. रवी नावाच्या एका आरोपीने ती कार तिथे सोडली होती. रवीच्या कुटुंबीयांशी चौकशी केल्यानंतर पोलिसांनी कारमधून इतर गोष्टी ताब्यात घेतल्या आहेत.
याआधी मिळालेल्या माहितीनुसार, रेणुकास्वामीचं पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांना त्याच्या शरीरावर गरम लोखंडाच्या रॉडने दिलेल्या चटक्याचे व्रण दिसून आले. त्याची नाक आणि जीभसुद्धा कापण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. इतकंच नव्हे तर रेणुकास्वामीचा जबडासुद्धा तोडण्यात आला होता. त्याच्या संपूर्ण शरीरातील असंख्य हाडं मोडलेली होती. रेणुकास्वामीच्या डोक्यालाही बराच मार होता. रेणुकास्वामी चित्रदुर्गमधील एका मेडिकल शॉपमध्ये असिस्टंट म्हणून काम करत होता. काही दिवसांपूर्वीच त्याचं लग्न झालं होतं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चित्रदुर्ग परिसरातून रेणुकास्वामीचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर शहरातील पश्चिमी भागात असलेल्या कामाक्षीपाल्या इथं त्याची हत्या करण्यात आली. रेणुकास्वामीचा मृतदेह एका नाल्यात आढळला होता.