मुंबई: ऋषभ पंत दिग्दर्शित आणि अभिनीत ‘कांतारा’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेला अभिनेता किशोर कुमार जी याचा ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आला आहे. यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. किशोर याचं ट्विटर अकाऊंट पुन्हा सक्रिय करण्याची मागणी चाहते करत आहेत. ट्विटरच्या काही नियमांचं उल्लंघन केल्यामुळे किशोर याचं अकाऊंट सस्पेंड केल्याचं म्हटलं जात आहे. यामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही.
किशोरचा ट्विटर अकाऊंट @actorkishore या नावाने आहे. हे युजरनेम सर्च केलं असता त्यावर account suspended असं दिसून येतं. ट्विटरच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे या अकाऊंटला सस्पेंड केलंय, असंही त्याखाली वाचायला मिळतं. किशोरने कधी आणि कोणत्या प्रकरणी नियमांचं उल्लंघन केलंय, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे चाहतेसुद्धा ट्विटरकडे उत्तर मागत आहेत.
काहींनी ट्विटरचे सीईओ एलन मस्क यांनासुद्धा टॅग करून उत्तर मागितलं आहे. किशोर ट्विटरवर बऱ्यापैकी सक्रिय होता. शेतकऱ्यांच्या समस्येबाबत तो ट्विटरवर आवाज उठवायचा. त्याने एकदा अभिनेत्री साई पल्लवीच्या वक्तव्याचंही समर्थन केलं होतं. साईने काश्मिरी पंडितांच्या हत्येची तुलना मुस्लिमांच्या हत्येशी केली होती. त्यावरून मोठा वाद झाला होता.
याच कारणामुळे किशोरचं अकाऊंट सस्पेंड केलं असावं, असा अंदाज काही नेटकरी वर्तवत आहेत. ट्विटर अकाऊंट सस्पेंड केल्याप्रकरणी अद्याप किशोरची प्रतिक्रिया समोर आली नाही.
‘कांतारा’नंतर किशोरच्या फॅन फॉलोईंगमध्ये वाढ झाली. या चित्रपटात त्याने वन अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. कांताराशिवाय किशोरने ‘द फॅमिली मॅन’ आणि ‘शी’ यांसारख्या वेब सीरिजमध्ये काम केलं. कन्नड, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेतील चित्रपटांमध्ये त्याने भूमिका साकारल्या आहेत.