बेंगळुरू: एकीकडे ‘कांतारा’ हा कन्नड चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळवत आहे. तर दुसरीकडे त्याचा मुख्य अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टीचा विनम्र स्वभाव प्रेक्षकांची मनं जिंकतोय. विविध मुलाखतींमध्ये ऋषभने सातत्याने कन्नड भाषेवरील आणि प्रेक्षकांवरील त्याचं प्रेम व्यक्त केलं आहे. ‘कांतारा’च्या यशाचा गर्व त्याच्या बोलण्यातून अजिबात जाणवत नसल्याच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ऋषभने हिंदीत काम करण्याविषयी त्याचं मत व्यक्त केलं आहे.
“मला कन्नड चित्रपटांवर काम करायचं आहे. मी कन्नडिगा असल्याचा मला खूप गर्व आहे. कन्नड फिल्म इंडस्ट्रीमुळे आणि कन्नड लोकांमुळे मी आज या ठिकाणी पोहोचू शकलो आहे. फक्त एक चित्रपट हिट झाला म्हणून माझं कुटुंब, माझ्या मित्रमैत्रिणी बदलणार नाहीत ना. माझ्या कामाचं मूळ हा कन्नड सिनेमाच आहे”, असं तो म्हणाला.
“कांतारा हा चित्रपट पॅन-इंडिया बनावा, या उद्देशाने मी काम केलं नव्हतं. कथा जितकी चांगली मांडता येईल, तितकं चांगलं यावर माझा भर होता. कथा चांगली होती म्हणून कांताराने स्वत: पुढची वाट शोधली. हे कसं झालं हे आम्हालाही कळलं नाही”, असं ऋषभ पुढे म्हणाला.
कांताराच्या हिंदी व्हर्जनने आतापर्यंत 62 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन महिना उलटला असला तरी थिएटर्समध्ये अद्याप त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय.
ऋषभ शेट्टीने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्यानेच यामध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. केजीएफ-चाप्टर 1 आणि चाप्टर 2 या दोन्ही चित्रपटांना ‘कांतारा’ने चांगली टक्कर दिली आहे. हिंदी आणि तेलुगू व्हर्जनलाही चांगला प्रतिसाद मिळतोय.