Kapil Sharma: विनोदवीर कपिल शर्मा याच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. रिपोर्टनुसार कपिल याला जीवेमारण्याची धमकी आली आहे. याआधी अभिनेता राजपाल यादव, कोरियोग्राफर रेमो डिसुझा आणि कॉमेडियन सुगंधा मिश्रा यांना देखील जीवेमारण्याची धमकी मिळाली आहे. ईमेल्सद्वारे सेलिब्रिटींना धमकी मिळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ज्यामुळे सेलिब्रिटींमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे.
कपिल शर्माला धमकीचा ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीने कॉमेडियनसह त्याचे नातेवाईक, कुटुंबातील सदस्य, सहकारी आणि शेजाऱ्यांना देखील जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी मुंबईतील अंबोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने तपास करण्यास सुरुवात केली आहे.
याबाबत कपिल किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेलं नाही. फक्त ई-मेलचा आयपी ॲड्रेस पाकिस्तानचा असल्याचं बोललं जात आहे. कपिल शर्मापूर्वी राजपाल यादव, रेमो डिसूझा आणि सुगंधा मिश्रा यांनाही मृत्यूचे ईमेल आले आहेत. ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीचे नाव विष्णू असल्याचे सांगण्यात येत आहे.
ईमेलद्वारे धमकी कपिलला धमकी देण्यात आली आहे की, ‘ईमेलमध्ये धमकी दिली आहे. हे कोणतं पब्लिसिटी स्टंट नाही. तुझ्या सर्व एक्टिव्हिटीची माहिती आमच्याकडे आहे. आम्ही पुढील 8 तासांत तुझ्याकडून त्वरित प्रतिसादाची अपेक्षा करत आहोत. जर आम्हाला काही उत्तर मिळालं नाही तर विष्णू…. तू हे प्रकरण गांभीर्याने घेत नाही असे आम्ही मानू.’ धमकी देणाऱ्याने वेगवेगळ्या वेळेत सेलिब्रिटींना धमकीचे ईमेल पाठवले आहेत.
सेलिब्रिटींनी धमकी प्रकरण हे पहिल्यांदा झालेलं नाही. अभिनेता सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांना देखील अनेकदा जीवेमारण्याची धमकी मिळाली आहे. सलमान खानच्या घराबाहेर देखील गोळीबार करण्यात आला. ज्याची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याने घेतली. त्यानंतर भाईजानच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली. तर अभिनेत्याने बुलेटप्रूफ कार देखील खरेदी केली आहे.