कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरचं खास नातं आहे. कपिल शर्माने एकेकाळी मध्यरात्री केलेल्या ट्विट्सचा वाद सर्वांनाच माहित असेल. त्यानंतर आता एका कार्यक्रमात त्याला ट्विटरवरील बॉयकॉट ट्रेंडबाबत (boycott trend) प्रश्न विचारला असता त्याने भन्नाट उत्तर दिलं. त्याचप्रमाणे अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’ या चित्रपटाविरोधात बॉयकॉट ट्रेंड सुरू असल्याचं मी ऐकलं नाही, असं त्याने म्हटलं. गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवर (Twitter) बॉयकॉट ट्रेंड जोरदार सुरू आहे. आमिरचा लाल सिंग चड्ढा, अक्षय कुमारचा रक्षाबंधन, शाहरुख खानचा पठाण, विजय देवरकोंडाचा लायगर यांसारख्या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणी नेटकऱ्यांकडून केली जात आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना कपिल शर्मा म्हणाला, “मला ट्विटरपासून लांबच राहू द्या. खूप कष्ट घेऊन मी त्या वादातून बाहेर पडलोय.”
“माहीत नाही सर, मी इतका हुशार नाही. माझा स्वत:चा कोणता चित्रपट आता येत नाहीये. पण हे ट्रेंड वगैरे चालूच असतात. हे सगळं त्या वेळेपुरतं असतं. अक्षय कुमार यांच्या कोणत्या चित्रपटावर बहिष्काराची मागणी झाल्याचं मी ऐकलं नाही. सर, या ट्विटरच्या विश्वापासून मला लांबच ठेवा. मी खूप प्रयत्नांनंतर त्यातून बाहेर पडलोय”, असं कपिल म्हणाला.
अनु रंजन यांनी आयोजित केलेल्या फॅशन शोमध्ये नुकतीच कपिलने हजेरी लावली होती. या फॅशन शोमध्ये कपिलने रॅम्प वॉकसुद्धा केला होता. यावेळी त्याने काळ्या रंगाचा जॅकेट आणि ब्लॅक-गोल्डन पँट्स परिधान केले होते. त्याच्या या लूकची तुलना अनेकांनी रणवीर सिंगच्या लूकशी केली. कपिल या फॅशन शोचा शो स्टॉपर होता आणि रॅम्प वॉकवर त्याने काही मजेशीर पोझसुद्धा दिले होते. अनु रंजन या अभिनेत्री अनुष्का रंजनच्या आई आहेत. यावेळी अनुष्का आणि तिचा पती आदित्य सील यांनीसुद्धा हजेरी लावली होती. सतिश शाह, गुलशन ग्रोव्हर, पूनम ढिल्लन, सुझान खान, पूजा बत्रा, अर्सलान गोणी हे सेलिब्रिटीसुद्धा फॅशन शोला उपस्थित होते.