मुंबई- निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar) ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मबद्दल महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. करणने ट्विटर (Twitter) अकाऊंटला रामराम केला आहे. यासंदर्भात त्याने शेवटचं ट्विट करत माहिती दिली. ट्विटर अकाऊंटवरून एग्झिट करण्यामागचं नेमकं कारण मात्र करणने या ट्विटमध्ये स्पष्ट केलं नाही. मात्र आयुष्यात सकारात्मक ऊर्जेसाठी अधिक जागा निर्माण करत असल्याचं त्याने म्हटलंय. या ट्विटद्वारे त्याने एकंदरीत बॉलिवूड (Bollywood) बॉयकॉट कल्चर आणि ट्रोलिंगविरोधात अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
‘फक्त अधिकाधिक सकारात्मक ऊर्जेसाठी जागा निर्माण करत आहे आणि त्या दिशेने उचललेलं हे महत्त्वाचं पाऊल आहे. गुडबाय ट्विटर’, असं ट्विट करणने केलं आहे. करणने हे ट्विट करताच त्यावरून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
‘सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपेक्षा सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक शांती अधिक महत्त्वाची आहे’, अशी कमेंट एकाने केली. तर ‘कृपया तू ट्विटर सोडू नकोस’, अशी विनंती दुसऱ्या युजरने केली. काहींनी तर करणच्या या निर्णयाचा आनंद व्यक्त केला. हास्यास्पद मीम्स पोस्ट करत त्यांनी करणचे आभार मानले आहेत.
कॉफी विथ करणच्या यंदाच्या सिझनमध्ये करणने सोशल मीडियावरील ट्रोलिंग आणि नकारात्मकतेविषयी भाष्य केलं होतं. काही वर्षांपूर्वी अस्वस्थता आणि चिंतेचा सामना केल्याचंही करणने स्पष्ट केलं. इतकंच नव्हे तर यासाठी त्याला उपचारही घ्यावे लागले होते.
बॉलिवूड हंगामा या वेबसाइटला दिलेल्या एका मुलाखतीत करण म्हणाला, इंडस्ट्रीतीलच काही लोकांना ब्रह्मास्त्र हा चित्रपट अयशस्वी ठरावा असं वाटत होतं. ही अत्यंत निराशाजनक बाब आहे, असं तो म्हणाला होता.
करण जोहरच्या आधी अनेक कलाकारांनी ट्विटर अकाऊंटवरून काढता पाय घेतला आहे. सततच्या ट्रोलिंगला वैतागून त्यांनी हे पाऊल उचललं होतं.