मुंबई: गेल्या वर्षभरात बॉलिवूडचे मोजकेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. बिग बजेट, मोठे कलाकार असूनही काही चित्रपट दणक्यात आपटले. हिंदी चित्रपटसृष्टीला नेमकं काय झालंय, असा प्रश्न चाहत्यांना पडला. गेल्या काही दिवसांत निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने जितक्या मुलाखती दिल्या, त्यात त्याने बॉलिवूड आणि इंडस्ट्रीतल्या कलाकारांविषयी मोकळेपणे मतं मांडली. कलाकारांच्या मानधनाविषयीही तो व्यक्त झाला होता. “कोरोना आणि लॉकडाऊननंतर चित्रपटांचा व्यवसाय कमी झाला. तरीसुद्धा अनेक बॉलिवूड कलाकारांनी आपली फी कमी करण्याऐवजी वाढवली आहे”, असंही तो म्हणाला होता.
आता पुन्हा एकदा करण जोहर इंडस्ट्रीतल्या कलाकारांवर भडकला आहे. बॉलिवूडमधील बरेच स्टार्स स्वत:विषयी गोड गैरसमज बाळगतात, असं तो म्हणाला. ‘स्टुडंट ऑफ द इअर’ हा चित्रपट हिट होऊनसुद्धा तोटा सहन करावा लागला, असं त्याने सांगितलं.
मास्टर्स युनियन पॉडकास्टमध्ये करण जोहरने सांगितलं की बॉलिवूडबद्दल तो फार भावनिक आहे, मात्र त्याची ही आवडती इंडस्ट्री नाही. याविषयी बोलताना करण पुढे म्हणाला, “माझ्यात बॉलिवूडसाठी बऱ्याच भावना आहेत. हिंदी सिनेसृष्टीत माझा जीव आहे. मात्र जर तुम्ही एका व्यावसायिकाच्या दृष्टीने मला विचारलं तर माझ्या मते तेलुगू सर्वाधिक फायदेशीर इंडस्ट्री आहे.”
“ही अत्यंत दु:खद बाब आहे की तुमच्या चित्रपटांना 5 कोटींची ओपनिंग मिळते आणि तुम्ही 20 कोटी रुपये फी मागता. हे कसं योग्य आहे? भ्रम असा एक आजार आहे ज्याची कोणतीच व्हॅक्सिन नाही”, अशा शब्दांत त्याने बॉलिवूड कलाकारांवर निशाणा साधला. त्याचप्रमाणे इंडस्ट्रीत काळा पैसा कुठेच नाही असंही त्याने या मुलाखतीत स्पष्ट केलं.
गेल्या वर्षी एका चर्चेदरम्यान करणने बॉलिवूडमधील नव्या कलाकारांविषयी मत मांडलं होतं. “आज जर मला नव्या टॅलेंटला लाँच करायचं असेल, नवा अभिनेता किंवा अभिनेत्रीला लाँच करायचं असेल तर कोणीच तो चित्रपट पाहणार नाही. कारण त्या चित्रपटाला इतकं प्रमोट करावं लागेल की तुम्ही PNA ची (पर्सनल नेटवर्क एजन्सी) वसुली कशी करू शकणार? त्यामुळे इतर भाषांमधील चित्रपटांची ज्या पद्धतीने मार्केटिंग होते, त्या तुलनेत हिंदी बेकार आहे.”