बॉलिवूड असो, टॉलिवूड असो किंवा भोजपुरी फिल्म इंडस्ट्री.. सेलिब्रिटींकडून होळी धूमधडाक्यात साजरी केली आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकजण गुलालाच्या रंगात रंगून जातो. मात्र असेही काही लोक आहेत, ज्यांना रंगपंचमी खेळायला अजिबात आवडत नाही. रंगांपासून ते चार हात लांबच राहतात. निर्माता-दिग्दर्शक करण जोहर त्यापैकीच एक आहे. करणला आधीपासूनच होळी आवडत नाही अशातला भाग नाही. मात्र एका घटनेनंतर त्याने रंगपंचमी खेळणं बंद केलं. अमिताभ बच्चन यांच्या घरातील होळी पार्टीनंतर करणने हा निर्णय घेतला. करणच्या या निर्णयामागे अभिषेक बच्चन कारणीभूत आहे. खुद्द करणनेच हा किस्सा सांगितला होता.
करण जोहर प्रत्येक सण-उत्सव उत्साहात साजरा करतो. पण तो होळीपासून मात्र चार हात लांबच राहतो. ‘इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स’मध्ये करणने हा किस्सा सांगितला होता. अभिषेक बच्चनमुळे रंगपंचमी खेळायला आवडत नसल्याचं तो म्हणाला. करणच्या लहानपणीचा हा किस्सा आहे. जेव्हा तो 10 वर्षांचा होता तेव्हा तो अमिताभ बच्चन यांच्या घरी रंगपंचमी खेळायला गेला होता. बिग बींच्या ‘जलसा’ या बंगल्यावर जंगी होळी पार्टीचं आयोजन केलं जातं. या पार्टीला बॉलिवूड इंडस्ट्रीतील बरेच सेलिब्रिटी आवर्जून येतात. करणला मात्र रंग लावणं आवडायचं नाही. वडील हिरू यांच्यासोबत तो बिग बींच्या होळी पार्टीला पोहोचला होता.
बिग बींच्या घरी होळी पार्टीला पोहोचलेल्या करणने सर्वांना सांगण्याचा प्रयत्न केला की त्याला रंगपंचमी खेळायला आवडत नाही. मात्र तो काही बोलण्याआधीच अभिषेकने करणला उचलून पूलमध्ये फेकलं. अभिषेकने करणला पूर्णपणे रंगात माखलं होतं. या घटनेनंतर करण खूप घाबरला होता. तेव्हापासून करणने रंगपंचमी खेळणं बंद केलं.
अमिताभ बच्चन यांची होळी पार्टी ही बॉलिवूडमधल्या अविस्मरणीय होळी पार्ट्यांपैकी एक असते. बिग बींच्या घरी होळी पार्टीला जे सेलिब्रिटी यायचे, त्यांचं पाण्याच्या टबात बुडवून स्वागत केलं जायचं. नाचणं-गाणं यांसह खाण्याचीही चंगळ असायची. याशिवाय राज कपूर यांच्या आरके स्टुडिओजमध्येही धूमधडाक्यात होळी साजरी केली जाते.