प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक करण जोहरची आई हिरू जोहर यांना शनिवारी संध्याकाळी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हिरू यांना रुग्णालयात दाखल करताच फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा त्यांच्या भेटीसाठी पोहोचला आहे. पापाराझी अकाऊंटवर करण आणि मनिष यांचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. करणच्या आईचं वय 81 वर्षे असून त्यांना रुग्णालयात कशासाठी दाखल करण्यात आलंय, याबद्दलची माहिती अद्याप समोर आली नाही. पण हिरू यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचं काही कारण नाही, अशी माहिती जोहर कुटुंबाच्या जवळच्या व्यक्तीने एका वेबसाइटशी बोलताना दिली.
गेल्या काही वर्षांत हिरू यांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. 2021 मध्ये त्यांच्यावर स्पायनल फ्युजन आणि गुडघा प्रत्यारोपण अशा दोन मोठ्या शस्त्रक्रिया पार पडल्या होत्या. करण त्याच्या आईविषयी अनेकदा मोकळेपणे व्यक्त होतो. ‘फॅब्युलस लाइव्स व्हर्सेस बॉलिवूड वाइव्स’ या शोमध्ये त्याने सांगितलं होतं की सरोगसीच्या माध्यमातून झालेल्या त्याच्या जुळ्या मुलांचा सांभाळ त्याची आईच करते. त्यामुळे करणची मुलं हिरू यांनाच ‘मम्मा’ असं हाक मारतात.
फाये डिसूझा यांच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत करण म्हणाला होता, “आमची मॉडर्न फॅमिली आहे. ही एक असामान्य परिस्थिती आहे. म्हणून मला मुलांच्या विविध प्रश्नांना सामोरं जावं लागतंय. आमचा जन्म कोणाच्या पोटी झाला? आमची मम्मा ही खरी मम्मा नाही, ती आमची आजी आहे, अशा प्रश्नांचा भडीमार माझ्यावर होतोय. त्यासाठी मी स्वत: समुपदेशन घेण्यासाठी शाळेत जातोय. अशा परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा, त्यांना काय उत्तरं द्यायची, हे सर्व मी समजून घेतोय. अर्थात हे सर्व सोपं नाही. किंबहुना पालक होणं कधीच सोपं नसतं.”