मुंबई : 25 ऑक्टोबर 2023 | प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर अनेकदा लैंगिकता या मुद्द्यावरून मोकळेपणे व्यक्त झाला. मात्र एकेकाळी याविषयी कोणालाच माहीत नव्हतं. बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खान असा पहिला व्यक्ती होता, ज्याला करणने त्याच्या सेक्शुअल ओरिएंटेशनबद्दल सांगितलं होतं. आता बऱ्याच वर्षांनंतर करणने याविषयीचा खुलासा केला आहे. करणने हेसुद्धा सांगितलं की, “माझे आईवडीलसुद्धा सुरुवातीला मला समजू शकत नव्हते. माझी मुलींसारखी हौस पाहून अनेकजण खिल्ली उडवायचे. तेव्हा शाहरुख अशी व्यक्ती होती, ज्याने मला वेगळं वाटू दिलं नाही.” निखिल तनेजाच्या ‘बी अ मॅन यार’ या शोमध्ये करणने नुकतीच हजेरी लावली होती. यावेळी तो मोकळेपणे व्यक्त झाला.
“मी ठीक आहे, याची जाणीव करून देणारी पहिली व्यक्ती म्हणजे शाहरुख खान. त्याचा जन्म आणि संगोपन अत्यंत पुरोगामी वातावरण झालं आहे. तो थिएटरमधून आला होता. त्याने विविध लोकांसोबत काम केलं होतं. माझे आई-वडीलसुद्धा मला नीट समजू शकत नव्हते. मला हळूहळू जाणवू लागलं होतं की माझ्यातील स्त्री-पक्ष अत्यंत प्रकर्षाने समोर येत आहे. मात्र त्याची केवळ खिल्लीच उडवली जात होती. जसजसा मी मोठा होत गेलो, तसं लोक त्याबद्दल बोलणं कमी करू लागले. मात्र हे मला निश्चितपणे माहीत होतं की माझ्या चालण्याच्या पद्धतीवरून, बोलण्यावरून चारही बाजूंना चर्चा होत होती”, असं करण म्हणाला.
याविषयी करण पुढे म्हणाला, “शाहरुख माझ्याशी मोकळेपणे बोलायचा. त्यामुळे जेव्हा मला माझ्या व्यक्तीत्व आणि सेक्शुॲलिटीबद्दल सर्वांत मोठी गोष्ट बोलायची होती, तेव्हा सर्वांत आधी मी त्यालाच सांगितलं होतं.” या मुलाखतीत करणने असंही सांगितलं की जेव्हा तो दहावीत होता, तेव्हा एका मुलीवर प्रेम करत असल्याचं नाटकसुद्धा त्याने केलं होतं.