बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने एका कॉमेडी शोवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या शोमध्ये करणचं चित्रण अत्यंत वाईट पद्धतीने केल्याचं त्याने म्हटलंय. रविवारी रात्री करणने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट लिहित याबद्दल नाराजी व्यक्त केली. आईसोबत बसून हा शो बघत असताना करणला त्याच्यावरून केलेली मस्करी आक्षेपार्ह वाटली. त्यामुळे पोस्ट लिहित त्याने या शोला फटकारलं आहे. ‘मी माझ्या आईसोबत बसून टीव्ही बघत होतो आणि एका वाहिनीवर मी रिॲलिटी कॉमेडी शोचा प्रोमो पाहिला. त्यामध्ये एक कॉमेडियन माझी नक्कल अत्यंत वाईट पद्धतीने करत होता’, असं त्याने लिहिलं आहे.
“ट्रोलर्स, चेहरा नसलेल्या आणि नाव नसलेल्या लोकांकडून मला हे अपेक्षित आहे. पण जेव्हा तुमची स्वत:चीच इंडस्ट्री एका अशा व्यक्तीचा अपमान करते, जी गेल्या 25 वर्षांपासून इथे काम करतेय, तेव्हा तुम्ही ज्या काळात जगत आहात, त्याचा आरसा दाखवते. मला या गोष्टीचा राग आला नाही, पण मला त्याचं वाईट वाटतंय”, अशा शब्दांत करण जोहरने नाराजी व्यक्त केली. करणच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. निर्माती एकता कपूरने करणची साथ दिली आहे. ‘हे अनेकदा झालंय. शोजमध्ये अशा पद्धतीची वाईट मस्करी केली जाते. पुरस्कार सोहळ्यांमध्येही हेच पहायला मिळतं आणि त्यांची अपेक्षा असते की तुम्ही त्या शोज किंवा सोहळ्यांमध्ये उपस्थित राहावं. करण कृपया त्यांना तुझ्या एखाद्या चित्रपटाची नक्कल करायला सांग’, असं तिने लिहिलं आहे. एकताची ही पोस्ट करणने त्याच्या स्टोरीमध्ये पुन्हा शेअर केली आहे.
करणने त्याच्या या पोस्टमध्ये कोणत्याच शो किंवा वाहिनीचं नाव घेतलं नसलं तरी अनेक नेटकऱ्यांनी त्याविषयी अंदाज वर्तवला आहे. सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ या कॉमेडी शोमध्ये करणची खिल्ली उडवली गेली, असं अनेकांनी म्हटलंय. या शोमध्ये एका कॉमेडियनने करणची नक्कल केली होती. करणच्या ‘कॉफी विथ करण’ या शोचं नाव बदलून ‘टॉफी विथ चुरण’ असं म्हटलं गेलं होतं.