तिच्या छातीपासून पोटापर्यंत ती खूण..; मुलीबद्दल बोलताना बिपाशाचा पती भावूक

| Updated on: Aug 16, 2024 | 1:35 PM

अभिनेत्री बिपाशा बासूने 2022 मध्ये मुलीला जन्म दिला. देवी असं तिच्या मुलीचं नाव असून तिच्या हृदयात जन्मापासूनच दोन छिद्र असल्याचा खुलासा दोघांनी गेल्या वर्षी केला होता. देवीवर ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली होती. याबद्दल बोलताना करण भावूक झाला.

तिच्या छातीपासून पोटापर्यंत ती खूण..; मुलीबद्दल बोलताना बिपाशाचा पती भावूक
करण सिंह ग्रोवर, बिपाशा बासू
Image Credit source: Instagram
Follow us on

टेलिव्हिजनमधून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणारा अभिनेता करण सिंह ग्रोवर याने त्याच्या करिअरमध्ये अनेक चढउतार पाहिले. करणचं खासगी आयुष्यही अनेकदा चर्चेत राहिलंय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करण त्याच्या मुलीविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. करणची पत्नी आणि अभिनेत्री बिपाशा बासूने 12 नोव्हेंबर 2022 रोजी मुलीला जन्म दिला. देवी असं त्यांनी त्यांच्या मुलीचं नाव ठेवलंय. देवी आता दीड वर्षाची असून जन्मानंतर तिला आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. देवीवर झालेल्या ‘ओपन हार्ट सर्जरी’बद्दल आठवून करण या मुलाखतीत भावूक झाला होता.

करण म्हणाला, “माझी मुलगी जेव्हा जन्माला आली, तेव्हाच तिच्या हृदयात दोन छिद्र होते. अवघ्या तीन महिन्यांची असताना तिच्यावर ओपन हार्ट सर्जरी करावी लागली होती. मी माझ्या मुलीसोबत मिळून एका कठीण काळाचा सामना केला आहे. त्यावेळी आमच्यासमोर अनेक आव्हानं आणि समस्या होत्या. माझी मुलगी देवीने जे सहन केलं, ते मी शब्दांत मांडू शकत नाही. तिच्या छातीवर एक खूण आहे, जी तिच्या पोटापर्यंत जाते. तिने आणि तिच्या आईने जे काही सहन केलं, त्याची तुलना कोणत्याच गोष्टीशी केली जाऊ शकत नाही.”

हे सुद्धा वाचा

“माझ्या आयुष्यात असं काही झालं नव्हतं. मी खूप नशिबवान आहे. माझ्या मुलीने हे सिद्ध केलं की ती एक फायटर आहे. तिचा पिता बनल्याबद्दल मी स्वत:ला खूप नशिबवान समजतो”, अशा शब्दांत तो व्यक्त झाला. याआधी दिलेल्या एका मुलाखतीतही करण मुलीच्या सर्जरीबद्दल व्यक्त झाला होता. “सुरुवातीला प्रत्येक शूटिंग शेड्युलच्या वेळी मला असं वाटायचं की कामावर जाऊच नये. कारण ती परिस्थिती फार गंभीर होती आणि मुलीला सोडून जाणं खूप कठीण होतं. ती परिस्थिती मी योग्यप्रकारे हाताळली नाही. पण बिपाशामुळे मला त्यातून सावरण्याचं बळ मिळालं. त्यावेळी मुलीची अशी परिस्थिती पाहण्यापेक्षा मला माझा मृत्यू सोपं वाटत होतं. एकदा रुग्णालयात जेव्हा आम्हाला देवीला डॉक्टरांकडे सोपवायचं होतं, तेव्हा तो क्षण माझ्यासाठी खूप कठीण होता. मी तिला डॉक्टरांच्या हातात देऊच शकत नव्हतो. माझे हातपाय सुन्न झाले होते.”

बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवरने 30 एप्रिल 2016 रोजी लग्न केलं. लग्नाच्या सहा वर्षांनंतर तिने मुलीला जन्म दिला. करणप्रमाणेच देवीलाही पेंटिंगची फार आवड आहे. या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ बिपाशा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत असते.