मुंबई : अभिनेत्री शर्मिला टागोर सध्या त्यांच्या ‘गुलमोहर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी बऱ्याच काळानंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन केलं आहे. गुलमोहर चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचं प्रेक्षक-समिक्षकांकडून कौतुक झालं. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी सून करीना कपूरच्या टॉक शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये दोघींनी विविध विषयांवर गप्पा मारल्या. करीनाने विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी मनमोकळेपणाने उत्तरं दिली. यावेळी तिने मुलगी आणि सून यांच्यात काय फरक असतो, असाही प्रश्न विचारला होता. त्यावर शर्मिला टागोर यांनी दिलेल्या उत्तराने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.
करीना कपूरचा ‘व्हॉट वुमेन वाँट’ हा टॉक शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. यामध्ये सैफ अली खानची आई आणि करीनाची सासू शर्मिला टागोर यांनी हजेरी लावली. करीनाने त्यांना खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याविषयी बरेच प्रश्न विचारले. शर्मिला यांनीही या प्रश्नांची उत्तरं मजेशीर पद्धतीने दिली आहेत. या सर्व प्रश्नांपैकी मुलगी आणि सूनेमध्ये काय फरक असतो, या प्रश्नाने सर्वांचं लक्ष वेधलंय.
शर्मिला यांनी या प्रश्नाचं उत्तर आपल्याच खास अंदाजात दिलं. त्या म्हणाल्या, “मुली त्या असतात, ज्यांच्यासोबत आपण मोठे होतो. त्यामुळे तुम्ही त्यांच्या स्वभावाला नीट ओळखता. तिला कोणत्या गोष्टीचा राग येतो हे तुम्हाला माहीत असतं. त्या गोष्टींना कसं हाताळायचं याचीही तुम्हाला कल्पना असते. त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी अत्यंत सहजपणे वागू शकता. मात्र सुनेशी तुमची भेट तेव्हा होते, जेव्हा ती मोठी झालेली असते.”
शर्मिला यांनी पुढे म्हटलं, “सुनेच्या स्वभावाला ओळखायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे जेव्हा नवीन मुलगी तुमच्या घरात सून म्हणून येते, तेव्हा हे तुमचं कर्तव्य असतं की तुम्ही तिचं स्वागत खूप चांगल्या पद्धतीने कराल. तुमच्या घरात ती कम्फर्टेबल होऊ शकेल, याची काळजी घ्यावी लागते. तिला जर वेगळं काही खायची इच्छा असेल तर ते खायला द्याव आणि तिचीसुद्धा काळजी घ्यावी. मुलगा आणि सुनेच्या नात्याला कधीच टेकओव्हर करण्याचा प्रयत्न करायला नाही पाहिजे. त्यांना पुरेशी स्पेस दिली पाहिजे.”
करीनाने 2012 मध्ये सैफ अली खानशी लग्न केलं. ‘टशन’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली. हे दोघं काही वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्येही राहिले होते.