मुंबई | 12 सप्टेंबर 2023 : बॉलिवूड सेलिब्रिटींना चाहत्यांकडून नेहमीच खूप प्रेम मिळतं. मात्र जर त्याच सेलिब्रिटींकडून एखादी चूक झाली, तर सोशल मीडियावर ट्रोल करण्यात जराही विलंब होत नाही. असंच काहीसं अभिनेत्री करीना कपूर खानसोबत घडलंय. करीनाने मुंबईत पार पडलेल्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात राष्ट्रगीत गाताना करीनाकडून मोठी चूक झाली. याच चुकीमुळे तिला सध्या ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. कार्यक्रमातील करीनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
महिलांशी निगडीत या कार्यक्रमात करीनाने लाल रंगाची शॉर्ट कुर्ती आणि धोती स्कर्ट परिधान केला होता. या कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. या व्हिडीओमध्ये राष्ट्रगीत गाताना करीना तिचे दोन्ही हात पकडून उभी राहताना दिसली. सुरुवातीला करीना सावधान मुद्रामध्येच उभी होती. मात्र नंतर ती दोन्ही हात पकडून उभी राहतेय यावरूनच नेटकऱ्यांनी तिच्यावर जोरदार टीका केली आहे.
‘हिला कोणीतरी सांगा की राष्ट्रगीत सुरू असताना सावधान मुद्रामध्ये उभं राहायचं असतं, हात पकडून नाही’, असं एका युजरने म्हटलंय. तर ‘राष्ट्रगीत हे सावधान स्थितीतच म्हटलं जातं. स्वत:ला मोठे स्टार म्हणणाऱ्यांकडून अशी चूक अपेक्षित नाही’, अशा शब्दांत दुसऱ्या युजरने फटकारलं. ‘राष्ट्रगीत सुरू असताना कसं उभं राहायचं हे अशिक्षित लोकांनाही माहीत असतं. करीनाला लाज वाटली पाहिजे’, असं आणखी एका नेटकऱ्याने म्हटलंय.
करीना लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. ‘जाने जान’ हा तिचा चित्रपट लवकर ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये तिच्यासोबत जयदीप आहलुवालिया आणि विजय वर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत. यासाठी ती फारच उत्सुक आणि त्याचसोबत चिंतीतसुद्धा आहे. “23 वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना मी जितकी नर्व्हस होते, त्यापेक्षा जास्त मी आता आहे,” असं करीना एका मुलाखतीत म्हणाली.
करीनाने 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रेफ्युजी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. इतकंच नव्हे तर करीनाचा पती आणि अभिनेता सैफ अली खान यानेसुद्धा तिला ओटीटीत काम करण्यापूर्वी महत्त्वपूर्ण सल्ला दिला होता. तू तुझा ॲटिट्यूड सोडून वाग, असं थेट सैफने करीनाला म्हटलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुद्द करीनाने याचा खुलासा केला.