दिग्गज अभिनेत्री आणि सैफ अली खानची आई शर्मिला टागोर त्यांचा 80 वा वाढदिवस साजरा करत आहेत. शर्मिला यांनी त्यांच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत. प्रेक्षकांमध्ये त्यांची प्रचंड लोकप्रियता होती. 8 डिसेंबर रोजी त्या आपला वाढदिवस साजरा करत असून यानिमित्त त्यांची सून अर्थात अभिनेत्री करीना कपूर खानने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. शर्मिला यांच्यासोबतचे काही मजेशीर फोटो पोस्ट करत करीनाने शुभेच्छा दिल्या आहेत. करीनाने तीन फोटो पोस्ट केल्या असून त्यातील पहिल्याच फोटोमध्ये सासू-सुनेचं नातं कसं आहे, हे स्पष्ट पहायला मिळतंय. करीना आणि शर्मिला या दोघींमध्ये मैत्रीपूर्ण नातं असल्याचं दिसतंय. त्यानंतर दुसऱ्या फोटोमध्ये शर्मिला या केसांमध्ये हेअर रोलर आणि डोळ्यांवर गॉगल लावून फोटोसाठी पोझ देताना दिसून येत आहेत. तिसऱ्या फोटोमध्ये त्या करीनाच्या मुलाचे लाड करताना पहायला मिळत आहे.
हे फोटो पोस्ट करत करीनाने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘आतापर्यंतची सर्वांत कूल Gangsta कोण आहे? मला सांगायची गरज आहे का? माझ्या सासूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्या सर्वोत्तम आहेत.’ करीनाचं तिच्या सासूसोबतचं खास नातं वेळोवेळी अधोरेखित झालं आहे. ‘कॉफी विथ करण 8’ या चॅट शोदरम्यान जेव्हा शर्मिला टागोर यांनी सैफ अली खानसोबत हजेरी लावली होती, तेव्हा त्यांनी सून करीना कपूरची एक क्लिप दाखवण्यात आली होती. त्यात ती सासू शर्मिला टागोर यांच्याविषयी बोलताना दिसली. “मी सैफला भेटल्यापासूनच त्यांना अम्मा म्हणून हाक मारू लागले. कारण त्यांच्यासोबत ते कनेक्शन सहज जुळलं होतं. त्या खूप प्रेमळ आणि काळजी घेणाऱ्या आहेत. त्या माझ्याकडे सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून पाहतात. सोहा आणि सबा यांच्यासारखीच मी त्यांची मुलगी आहे, असं त्या वागतात. त्यामुळे मला कधीच परकेपणा जाणवला नाही”, असं ती म्हणाली होती.
याच शोमध्ये शर्मिला यांनीसुद्धा करीनाचं कौतुक केलं होतं. “ती नेहमी जेवणाचं टेबल खूप सुंदररित्या सजवते. त्यानंतर ती मला विचारते, अम्मा तुम्हाला हे खायला आवडेल का? तुम्हाला ते खायला आवडेल का? त्यामुळे आमच्यात चांगली बाँडिग झाली. तिला डिनर नेहमी वेळेवर करायला आवडतं. त्यामुळे सर्वकाही खूप छान आहे. आयुष्याच्या बाबतीत खूप स्पष्टता आहे”, असं त्या म्हणाल्या होत्या.