Kareena Kapoor : अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) हिच्यानंतर बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आल्या, पण आजपर्यंत कोणत्याही नव्या अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये असलेलं बेबोचं स्थान मिळवण्यात यश मिळालं नाही. कारण करीनाने प्रत्येक सिनेमात एक वेगळा अंदाज प्रेक्षकांसमोर सादर केला. करीनाने आतापर्यंत केलेल्या सिनेमांमधील सर्वात जास्ट हिट ठरलेला सिनेमा म्हणजे, ‘३ इडियट्स’ (3 Idiots)… ‘३ इडियट्स’ सिनेमाला प्रदर्शित होवून आज १४ वर्ष झाली आहेत. तरी देखील सिनेमाबाबत चर्चा चाहच्यांमध्ये कायम रंगत असते. सिनेमात करीनाने वैद्यकीय विषयात शिक्षण घेत असलेल्या पिया सहस्त्रबुद्धी या मुलीच्या भूमिकेला न्याय दिला. सिनेमातील अभिनेता आमिर खान आणि करीना यांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली.
आता १४ वर्षांनंतर ‘३ इडियट्स’ सिनेमासाठी करीनाने दिलेल्या लूक टेस्टचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. विधू विनोद चोप्रा यांनी फिल्म्सच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवरून करीनाचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये एका फोटोमध्ये करीना मराठमोळ्या भूमिकेत दिसत आहे. सध्या सर्वत्र करीनाच्या लूकची चर्चा होत आहे.
जांभळ्या रंगाची नऊवारी साडी, गळ्यात मोत्याची माळ, मोकळे केस आणि चष्मा यामध्ये करीनाचा वेगळा लूक चाहत्यांच्या समोर आला आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर करीनाच्या मराठमोळ्या लूकची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. करीनाच्या मराठमोळ्या लूकला हिरवा कंदिल मिळाला असता तर, आमिर याच्यासोबत करीना ‘३ इडियट्स’ सिनेमात मराठमोळ्या भूमिकेत दिसली असती अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगत आहे.
‘३ इडियट्स’ (3 Idiots) सिनेमाने चाहत्यांच्या मनात घर केलं. २५ डिसेंबर २००९ साली प्रदर्शित झालेल्या ‘३ इडियट्स’ सिनेमाने जगण्याची एक नवी दिशा विद्यार्थ्यांना दाखवली. आजही सिनेमाची चर्चा रंगत असते. फक्त डिग्री मिळवण्यासाठी नाही तर, कायम काही तरी नवीन शिकता यावं म्हणून विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा असं चित्र सिनेमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवाय खरी मैत्री काय असते, हे देखील ‘३ इडियट्स’ सिनेमात योग्य पद्धतीत मांडण्यात आलं. (kareena kapoor instagram)
करिनाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री अभिनेता आमिर खान याच्यासोबत ‘लाल सिंह चड्ढा’ सिनेमात दिसली. पण सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचं मनोरंजन करु शकला नाही. आता करीनाच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत चाहते आहेत.