मुंबई : बॉलिवू़ड अभिनेत्री करीना कपूर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. त्यानंतर बीएमसीने तातडीने कारवाई करत तिचे घर सील केले आहे. तिच्याबरोबर अमृता आरोरा ही सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. मुंबईत कोरोनाच्या केसेस दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत अशातच लोकांकडून नियमांचं काटेकोर पालन होताना दिसत नाही, त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे.
दोघींही काही पार्ट्यांमध्ये झाल्या होत्या सामील
करीना कपूरच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या आरटीपीसीआर टेस्ट करण्याचे निर्देश बीएमसीकडून देण्यात आले आहेत. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार तिचे घर सील करण्यात आले आहे. करीनाने ती कोणाच्या संपर्कात आतापर्यंत आली आहे, हे पालिकेला स्पष्ट केले नाही, मात्र पालिकेकडून खबरदारी म्हणून काही नियम लागू केले जात आहेत. राज्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने वारंवार मुख्यमंत्र्यांपासून ते प्रशासनापर्यंत सर्वांकडून कोरोना नियमांचं पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तर दुसरीकडे बॉलिवूड सेलिब्रेटी पार्टी करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोनाचे रुग्ण पुन्हा झपाट्याने वाढू लागले आहेत. अशा पार्ट्यांमुळेच करीना आणि अमृता कोरोनाबाधित झाल्याचं बोलले जात आहे.
कोरोनाचा बॉलिवूडलाही मोठा फटका
बॉलिवूडचे अभिनेते, अभिनेत्री पार्ट्या करण्यात आता व्यस्त असले तरी काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे बॉलिवूडचेही मोठे नुकसान झाले आहे. बॉलिवूडवर अलंबून असलेल्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यानंतर आता कुठे थोडा दिलासा मिळाला होता, सिनेमागृहे पुन्हा उघडली होती. बॉक्स ऑफिसवर पुन्हा तेजी आली आहे. अशातच ओमिक्रॉनचा शिरकाव आणि बॉलिवूडमध्ये कोरोना याने चिंता पुन्हा वाढवली आहे.