कर्नाटक : अभिनेत्री जान्हवी कपूरचे वडील आणि चित्रपट निर्माते बोनी कपूर मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कर्नाटकमधील निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी बोनी कपूर यांच्या नावाने नोंदणी केलेल्या बीएमडब्ल्यू कारमधून चांदीची भांडी जप्त केली आहेत. कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या हेब्बालू टोलजवळील चेक पोस्टवरून शनिवारी 8 एप्रिल रोजी अधिकाऱ्यांनी ही कार जप्त केली. या कारमध्ये पाच पेट्यांमध्ये चांदीची भांडी भरली होती. या भांड्यांची बाजारातील किंमत सुमारे 39 लाख रुपये असल्याचं म्हटलं जात आहे.
ही चांदीची भांडी चेन्नईहून मुंबईला आणली जात होती, असं समजतंय. तपास अधिकाऱ्यांनी गाडीच्या चालकाला चांदीच्या भांड्यांशी संबंधित कागदपत्रे दाखण्यास सांगितली असता तो दाखवू शकला नाही. तसंच ती कोणाची आहेत, कुठे नेली जात आहेत, याविषयी तो ठामपणे माहिती देऊ शकला नाही. या भांड्यांमध्ये चमचे, ताटं आणि पाण्याचे मगसुद्धा होते. ही भांडी जप्त केल्यानंतर अधिकाऱ्यांनी कारचा चालक सुलतान खान आणि हरी सिंग नावाच्या व्यक्तीविरुद्ध दावणगेरे ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या चौकशीदरम्यान सुलतान आणि हरी यांनी ही चांदीची भांडी बोनी कपूर आणि त्यांच्या कुटुंबीयांची असल्याचं सांगितलं. मात्र ही भांडी बोनी कपूर यांचीच आहेत का हे अद्याप निश्चित झालेले नाही. तसंच त्याच्याशी संबंधित कोणतीही कागदपत्रं सापडली नाहीत. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून तिथे आचारसंहिताही लागू झाली आहे.
बोनी कपूर हे बॉलिवूडमधील नामांकित निर्मात्यांपैकी एक आहेत. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी काही चित्रपटांमध्ये भूमिकाही साकारल्या आहेत. त्यांची मुलगी जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. तर खुशी कपूर ही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
बोनी कपूर यांची पत्नी श्रीदेवी यांचं निधन 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईत झालं होतं. त्या 54 वर्षांच्या होत्या. भाचा मोहीत मारवाहच्या लग्नात सहभागी होण्यासाठी त्या दुबईला गेल्या होत्या. श्रीदेवी यांचं निधन बाथटबमध्ये बुडून झाल्याचं म्हटलं गेलं.