अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘पृथ्वीराज’ (Prithviraj) हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी फक्त दोन आठवडे शिल्लक असतानाच आता करणी सेनेनं (Karni Sena) चित्रपटाच्या नावावरून नवा वाद निर्माण केला आहे. चित्रपटाचं नाव ‘पृथ्वीराज’ असं न ठेवता ‘सम्राट पृथ्वीराज चौहान’ असं ठेवावं, अशी मागणी त्यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वीच करणी सेनेला अक्षयचा हा चित्रपट दाखवण्यात आला. चित्रपटातील सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या भूमिकेबाबत काहीच आक्षेप नसल्याचं त्यांनी त्यानंतर स्पष्ट केलं. मात्र आता नावावरून त्यांनी आक्षेप घेतला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना त्यांनी नाव बदलण्याची मागणी केली आहे.
करणी सेनेचे सुरजीत सिंह राठोड ‘ई टाइम्स’शी बोलताना म्हणाले, “यश राज फिल्म्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षये विधानी यांची आम्ही भेट घेतली आणि त्यांनी आम्हाला चित्रपटाच्या नावात बदल करण्याचं आश्वासन दिलंय. त्यांना आमची मागणी योग्य वाटतेय. जर त्यांनी चित्रपटाच्या नावात बदल केला नाही तर राजस्थानमध्ये आम्ही हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. याबाबत आम्ही राजस्थानमधील वितरकांना आधीच कल्पना दिली आहे.”
या चित्रपटात अक्षयसोबतच संजय दत्त, सोनू सूद आणि मानुषी छिल्लरची भूमिका आहे. ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकणारी मानुषी या चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. चित्रपटात ती संयोगिताची भूमिका साकारतेय. यशराज फिल्म्स निर्मित ‘पृथ्वीराज’चं दिग्दर्शन डॉ चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केलं आहे. त्यांनी ‘चाणक्य’ या टेलिव्हिजन ड्रामाचंही दिग्दर्शन केलं होतं.याशिवाय द्विवेदी यांनी अनेक पुरस्कार विजेत्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. पिंजर हा त्यांचा असाच एक गाजलेला चित्रपट आहे.