मुंबई- अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिच्या ‘फोन भूत’ या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करतेय. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती नुकतीच ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचली. या एपिसोडमध्ये कतरिनाने तिच्या लग्नातील बरेच किस्से सांगितले. लग्नाच्या मंडपात कतरिना आणि विकी सप्तपदी घेत असतानाच दुसरीकडे भांडण झाल्याचंही तिने सांगितलं. लग्नानंतर पहिल्यांदाच कतरिनाने या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यामुळे तिच्याकडून बऱ्याच गोष्टी जाणून घेण्याची संधी कपिलनेही सोडली नाही.
तुमच्याकडेसुद्धा लग्नात नवरदेवाची चप्पल लपवली जाते का, असा प्रश्न कपिलने कतरिनाला विचारला. त्यावर उत्तर देताना कतरिनाने तिच्या लग्नातील हा मजेशीर किस्सा सांगितला. चप्पल लपवताना तिच्या बहिणी कशा प्रकारे भांडण करत होत्या, हे तिने सांगितलं.
“आमच्या लग्नातही भांडण झालं होतं. मला खूप मोठमोठ्याने आवाज येत होता. माझ्या मागे खूप गोंधळ सुरू होता. मी मागे वळून पाहिलं तर सर्वजण भांडत होते आणि विकीच्या चपला खेचण्याचा प्रयत्न करत होते. लग्नाच्या मंडपात अक्षरश: भांडण सुरू होतं. माझ्या बहिणी आणि विकीचे मित्र एकमेकांशी जोरजोरात भांडत होते”, असं कतरिनाने सांगितलं.
या भांडणात विजय कोणाचा झाला, असा प्रश्न अर्चना पुरण सिंगने विचारला. तेव्हा कतरिनाने तिला माहीत नसल्याचं सांगितलं. कारण तिने याविषयी नंतर कोणाला काहीच विचारलं नव्हतं. लग्नाच्या इतर विधींमध्ये मी इतकी व्यग्र होते की माझ्या ध्यानीमनीही ते आलं नाही, असं ती म्हणाली.
विकी कौशल आणि कतरिना कैफने डिसेंबर 2021 मध्ये लग्नगाठ बांधली. जयपूरमध्ये या दोघांनी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केलं. संपूर्ण कलाविश्वात या लग्नाची जोरदार चर्चा झाली होती.