मुंबई | 7 सप्टेंबर 2023 : ‘कौन बनेगा करोडपती’चा पंधरावा सिझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. केबीसी या शोचा चाहतावर्ग मोठा आहे. अमिताभ बच्चन या शोचं सूत्रसंचालन करतात. आपल्या ज्ञानाच्या जोरावर स्पर्धकांना या शोमध्ये धनराशी जिंकण्याची संधी मिळते. नुकताच या सिझनला पहिला करोडपती भेटला. 21 वर्षीय जसकरण सिंहने केबीसीमध्ये एक कोटी रुपये जिंकले आहेत. मात्र केबीसीमध्ये एक कोटी रुपये जिंकणाऱ्या स्पर्धकाला संपूर्ण रक्कम हाती मिळत नाही. त्यातून कर कापल्यानंतर उर्वरित रक्कम विजेत्याला दिली जाते. त्यामुळे एक कोटी रुपये जिंकलेल्या जसकरणच्या हाती किती रुपये येतील ते जाणून घेऊयात..
केबीसी शोमध्ये बक्षिस म्हणून जिंकलेल्या रकमेतून कर द्यावा लागतो. एखाद्या स्पर्धकाने आपल्या मेहनतीने पैसे जिंकल्यानंतर त्यावर कर का भरावा, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर इनकम टॅक्स विभाग त्या जिंकलेल्या रकमेवर स्लॅबऐवजी थेट 30 टक्के कर आकारतो. याशिवाय जिंकलेल्या धनराशीवरील टॅक्सवर चार टक्के सेससुद्धा द्यावा लागतो. म्हणूनच शोमध्ये एक कोटी रुपये जिंकणाऱ्या स्पर्धकाला कधीच संपूर्ण कोटी रुपये मिळत नाहीत.
रिपोर्ट्सनुसार कौन बनेगा करोडपती या शोमध्ये एक कोटी जिंकणाऱ्या स्पर्धकाला 30 टक्के आयकर कापून उर्वरित रक्कम दिली जाते. म्हणजेच एक कोटी रुपये जिंकल्यानंतर विजेत्याला त्यातून फक्त 70 लाख रुपयांच्या जवळपास पैसे मिळतात. या सिझनचा पहिला विजेता ठरलेल्या जसकरणला त्याच्या एक कोटी रुपयांतून 30 टक्के आयकर आणि आयकरावरील 4 टक्के सेससुद्धा द्यावा लागणार आहे. सेस एज्युकेशन आणि कृषी क्षेत्रासाठी वसूल केला जातो. म्हणून 33 लाख रुपयांच्या टॅक्सवर 4 टक्के सेस म्हणजेच जवळपास 1.32 लाख रुपये द्यावे लागतील.
पंजाबच्या तरण तारण जिल्ह्यात राहणाऱ्या जसकरणने एक कोटी रुपयांची धनराशी आपल्या नावे केली आहे. मात्र 7 कोटी रुपयांच्या प्रश्नाचं उत्तर देण्यात तो अपयशी ठरला. 21 वर्षांच्या जसकरणने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की जिंकलेल्या रकमेतून तो सर्वांत आधी त्याच्या कुटुंबीयांसाठी घर खरेदी करणार आहे. त्याचसोबत उरलेल्या रकमेचा वापर तो त्याच्या युपीएससी कोचिंगसाठी वापरणार आहे.