आमचं वैभव..; केशवराव भोसले नाट्यगृह जळताना पाहून मराठी अभिनेत्रीला अश्रू अनावर

| Updated on: Aug 09, 2024 | 1:00 PM

कोल्हापुरातील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवारी रात्री आग लागली. या आगीत संपूर्ण नाट्यगृह जळून खाक झालंय. अभिनेत्री सोनाली पाटीलने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत दु:ख व्यक्त केलंय.

आमचं वैभव..; केशवराव भोसले नाट्यगृह जळताना पाहून मराठी अभिनेत्रीला अश्रू अनावर
अभिनेत्री सोनाली पाटीलला अश्रू अनावर
Image Credit source: Instagram
Follow us on

कोल्हापुरातील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण नाट्यगृह जळून खाक झालं. शॉर्टसर्किटमुळे नाट्यगृहाला आग लागल्याचं म्हटलं जात आहे. या घटनेबद्दल कळताच अनेक कलाकारांनी हळहळ व्यक्त केली. आगीची घटना घडली तेव्हा अभिनेत्री सोनाली पाटील तिथेच होती. तिने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. नाट्यगृहाविषयी आणि तिथल्या आठवणी सांगताना सोनालीला अश्रू अनावर झाले. “आमचं वैभव पूर्ण खाक झालंय”, अशा शब्दांत ती व्यक्त झाली. ‘अत्यंत वाईट बातमी’ असं कॅप्शन देत तिने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

या व्हिडीओमध्ये सोनाली नाट्यगृहाबाहेर उभी असल्याचं पहायला मिळतंय. यात ती म्हणतेय, “मी आता कोल्हापुरात आहे. आजच मी इथे आली आणि आजचा दिवस हा आमच्या कोल्हापूरकरांसाठी आणि पूर्ण रंगभूमीसाठी अत्यंत वाईट आहे. केशवराव भोसले नाट्यगृह पूर्णपणे जळून खाक झालं आहे. त्याकडे बघायची इच्छा होत नाहीये. आम्हा सगळ्यांची नाळ जिथे जोडली गेली, ज्या रंगभूमीवर आम्ही उभे राहिलो, जिथे आमची नाटकं झाली, आमचं सगळ्यांत मोठं घर, आमचं वैभव पूर्णपणे खाक झालंय. ते पुन्हा कसं उभं राहील मला माहीत नाही.”

हे सुद्धा वाचा

सोनालीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी आणि कलाकारांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. आज (9 ऑगस्ट) संगीतसूर्य केशवराव भोसले यांची जयंती आहे. त्याच्या आदल्याच दिवशी नाट्यगृहाला आग लागल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनेक रंगकर्मींचं या नाट्यगृहाशी खूप जवळचं नातं होतं. अनेक कलाकारांसाठी ते त्यांचं दुसरं घरच होतं. नाट्यगृहाला लागलेली ही आग अत्यंत भीषण होती. 20 अग्निशामक दलाच्या गाड्यांनी तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ती विझवली गेली.

आगीनंतर या नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी रंगकर्मींनी पुढाकर घेतला आहे. अनेक सामाजिक संस्थाही मदतीला आल्या आहेत. उद्योजक, व्यापारी, देणगीदारांकडून मदतीची तयारी दर्शवली आहे. गायन समाज देवल क्लबचे संचालक चारुदत्त जोशी यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी राज्यातील अनेक कलाकारांशी संपर्क साधला आहे. त्यात सुबोध भावे, अवधूत गुप्ते, सचिन खेडकर, मकरंद अनासपुरे यांचाही समावेश आहे.