प्रसिद्ध चित्रपट आणि टीव्ही अभिनेते रसिक दवे (Rasik Dave) यांचं 29 जुलै रोजी निधन झालं. रसिक दवे यांच्या निधनाने मालिकाविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रसिक दवे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री केतकी दवे (Ketki Dave) यांची अवस्था खूप वाईट आहे. पतीच्या निधनानंतर दिलेल्या मुलाखतीत केतकी या अत्यंत भावूक झाल्या होत्या. केतकी यांची आई आणि अभिनेत्री सरिता जोशी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यांचा जावई म्हणजेच रसिक दवे हे डायलिसिसवर (dialysis) होते. रसिक यांना किडनीशी संबंधित समस्या होत्या.
बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत केतकी यांनी सांगितलं की, “रसिकला त्याच्या आजाराबद्दल कधीच बोलायचं नव्हतं. त्याला त्याचं आयुष्य खासगीत जगायला आवडायचं. त्याला वाटलं की सर्व काही ठीक होईल. पण त्याची तब्येत बरी नाही हे आम्हाला माहीत होतं. गेल्या काही दिवसांत त्याने मला नेहमी काम करत राहायला हवं, असं सांगितलं. मी आता काम करण्याच्या स्थितीत नाही, असं मी त्याला सांगायचे. पण तो मला नेहमी सांगायचा की शो चालूच राहिला पाहिजे आणि मी काम कधीच थांबवू नये. आजारी असतानाही तो सतत सांगत राहिला की सर्व काही ठीक होईल. आशा सोडू नकोस असा धीर तो मला देत होता.”
केतकी दवे पुढे म्हणाल्या, “आज मी सर्व काही मोठ्या हिंमतीने करत आहे. कारण तो नेहमी माझ्यासोबतच आहे. माझ्यासोबत माझं कुटुंब आहे, माझी आई, माझी मुलं आणि माझ्या सासू-सासऱ्यांचा मला मोठा आधार आहे. पण मला माझ्या नवऱ्याची खूप आठवण येते.”
केतकी दवे आणि रसिक दवे यांची पहिली भेट 1979 मध्ये एका नाटकाच्या सेटवर झाली होती. केतकी यांनी सांगितलं की, पहिल्याच भेटीत दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दोघांनी अनेक टीव्ही शो आणि नाटकांमध्ये एकत्र काम केलं. केतकी दवे आणि रसिक दवे यांनी 1983 मध्ये लग्नगाठ बांधली.
“जेव्हा रसिक यांना किडनीच्या आजाराचं निदान झालं तेव्हा मी खूप खचले होते. आई सरिता जोशी यांनी मला त्यावेळी खूप साथ दिली. आई मला नेहमी सांगायची की, माणूस दुःखात जगू शकतो, पण दु:खाला आपल्यावर कधीच जिंकू देऊ नये. आयुष्य आपल्या अटींवर जगलं पाहिजे आणि प्रत्येक आव्हानाला धैर्याने सामोरं गेलं पाहिजे. आपण असं धैर्य गमावू शकत नाही, असं ती मला नेहमी सांगायची. आज मी तोच प्रयत्न करत आहे. पण आता आयुष्य पूर्वीसारखं राहिलं नाही. प्रत्येक पावलावर मला रसिकची आठवण येईल. माझ्यासोबत माझं संपूर्ण कुटुंब आहे, पण त्याची आठवण नेहमीच राहील,” अशा शब्दांत केतकी यांनी भावना व्यक्त केल्या.