‘केजीएफ’ या चित्रपटामुळे देशभरात लोकप्रियता मिळवलेला कन्नड अभिनेता यश याने त्याच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर चाहत्यांना आवाहन केलं आहे. हैदराबादच्या संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीची घटना ताजी असतानाच त्याने चाहत्यांना स्वत:च्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची आणि सेलिब्रेशनदरम्यान दक्षता बाळगण्याची विनंती केली आहे. “माझे चाहते त्यांच्या आयुष्यातील ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत आणि मेहनत घेत आहेत, हे जाणून घेण्यातच माझा खरा आनंद आहे”, असं त्याने म्हटलंय. सोमवारी यशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर यासंदर्भातील पोस्ट लिहिली आहे. या पोस्टद्वारे त्याने चाहत्यांना सेलिब्रेशनचा अतिरेक न करण्याचं आवाहन केलं आहे.
यशने या पोस्टमध्ये काही जुन्या वाईट घटनांचीही उदाहरणं दिली. याआधी त्याच्या वाढदिवशी घडलेल्या दुर्दैवी घटनांमध्ये चाहत्यांना आपला जीव गमवावा लागला होता. ‘नवीन वर्षाची सुरुवात होत असताना, ही वेळ विचार करण्याची, संकल्प करण्याची आणि नवीन मार्ग निर्माण करण्याची आहे. तुम्ही सर्वांनी माझ्यावर केलेलं प्रेम अभूतपूर्व आहे. पण काही दुर्दैवी घटनासुद्धा घडल्या आहेत. त्यामुळे प्रेम व्यक्त करण्याची परिभाषा बदलण्याची वेळ आली आहे. विशेषत: जेव्हा माझा वाढदिवस साजरा केला जातो, तेव्हा प्रेम व्यक्त करण्यासाठी मोठमोठे कार्यक्रम किंवा इतर मोठमोठ्या गोष्टी करायची गरज नाही. तुमचं सुरक्षित असणं ही माझ्यासाठी सर्वांत मोठी भेट आहे. तुम्ही सकारात्मक उदाहरणं मांडा, तुमचं ध्येय साध्य करा, आनंद पसरवा.. हीच माझ्यासाठी सर्वोत्तम भेट असेल’, असं त्याने लिहिलंय.
त्याचप्रमाणे वाढदिवशी मी शूटिंगमध्येच व्यस्त असेन, असंही यशने स्पष्ट केलं. “माझ्या वाढदिवशी मी शहरात नसेन. माझ्या कामातच व्यस्त असेन. मात्र तुमच्या शुभेच्छा माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. सुरक्षित राहा आणि तुम्हा सर्वांना 2025 च्या खूप खूप शुभेच्छा”, असं त्याने पुढे म्हटलंय. येत्या 8 जानेवारी रोजी यश त्याचा 39 वा वाढदिवस साजरा करतोय. यशच्या याआधीच्या एका वाढदिवशी कर्नाटकातील गदग जिल्ह्यात त्याच्या तीन चाहत्यांनी आपला जीव गमावला होता. यशचे मोठे कटआऊट उभारताना त्यांचा वीजेचा धक्का लागला होता. या घटनेनंतर यशने चाहत्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत शोक व्यक्त केला.
आपल्या आवडत्या सेलिब्रिटीसाठी चाहते अनेकदा आपल्या जीवाची पर्वा न करता काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र आपल्या जीवाची सुरक्षा अधिक महत्त्वाची असल्याचं यशने चाहत्यांना समजावून सांगितलं आहे.