नवी दिल्ली- कन्नड सुपरस्टार यशची मुख्य भूमिका असलेल्या ‘केजीएफ 2’ या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर कमाल केली. फक्त कमाईच्याच बाबतीत नाही, तर केजीएफ- 2 ने कन्नड चित्रपटसृष्टीला एक वेगळी ओळख मिळवून दिली. केजीएफच्या फ्रँचाईजीमुळे यश ‘रॉकी भाई’ म्हणून लोकप्रिय झाला. शनिवारी यशने ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह 2022’मध्ये हजेरी लावली. यावेळी त्याने विविध मुद्द्यांवर मोकळेपणे भाष्य केलं. दाक्षिणात्य चित्रपटांची आधी कशा पद्धतीने खिल्ली उडवली जायची, याविषयीही तो व्यक्त झाला.
“सुरुवातीला लोक साऊथच्या चित्रपटांची खिल्ली उडवायचे. याची सुरुवात अशीच झाली होती. लोक म्हणायचे, एखाद्या चॅनलवर साऊथचा चित्रपट येतोय. त्यातील ॲक्शन सीन्स पाहून ते आश्चर्य व्यक्त करायचे. मात्र हळूहळू लोकांना ते आवडू लागलं. लोकांनी कलेच्या त्या पद्धतीला समजणं सुरू केलं”, असं यश म्हणाला.
दाक्षिणात्य चित्रपटांविषयी बोलताना तो पुढे म्हणाला, “मूळ समस्या अशी होती की आमचे चित्रपट खूप कमी किंमतीला विकले जायचे. त्याची डबिंगसुद्धा अत्यंत वाईट पद्धतीने केली जायची. चित्रपटातील पात्रांना खूप विनोदी नावं दिली जायची. लोकांनी मला रॅम्बो सर आणि ग्रेट लायन म्हणून हाक मारण्यास सुरुवात केली होती. ते असं का म्हणायचे हे मला आधी कळायचंच नाही. नंतर समजलं की माझ्या जुन्या चित्रपटांचं डबिंग तशा पद्धतीने केलं होतं.”
“लोक आधी कन्नड फिल्म इंडस्ट्रीला खूप छोटं समजायचे. त्यांचा अप्रोच नकारात्मक होता. आमचा बजेट खूप कमी असायचा आणि आम्ही काहीच करू शकणार नाही असा लोकांचा समज होता. माझ्या मते कोणतीच इंडस्ट्री छोटी किंवा मोठी नसते. उत्तम कथा असेल तर कोणत्याची इंडस्ट्रीचा चित्रपट मोठा बनू शकतो”, अशा शब्दांत यशने प्रतिक्रिया दिली.