मराठी सिनेसृष्टीत नेहमीच विविध विषयांवरील तसेच लक्ष वेधून घेणारे शीर्षक असलेले चित्रपट बनवले जातात. असाच एक चित्रपट खडमोड हा लवकरच आपल्या भेटीला येतोय. हा चित्रपट 9 ऑगस्ट 2024 रोजी रिलीज होतोय. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये मोठी क्रेझ देखील बघायला मिळतंय. खडमोड या उत्कंठावर्धक शीर्षकामुळे यात नेमके काय पाहायला मिळेल याचे कुतूहल चाहत्यांमध्ये नक्कीच बघायला मिळतंय. खडमोड हा शब्द प्रामुख्याने नंदूरबार भागातील आहे. याचा अर्थ आता सर्व गोष्टी विनाशाकडे चालल्या आहेत, असा होतो. मानवाने जंगलतोड करून अतिक्रमण केले आहे, ज्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत.
भविष्यात हे सावट आणखी गडद होणार असल्याचे संकेतच या चित्रपटाच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. जंगलतोडीचा परिणाम वाईल्ड लाईफवर होत आहे. पूर्वीच्या तुलनेत जंगले कमी झाल्याने जंगलातील जनावरे गाव तसेच शहरांकडे वळत आहेत. एखाद्या काॅलनीत किंवा घरात बिबट्या शिरल्याच्या बातम्या आपल्या कानावर नेहमीच येताना दिसतात.
आपण त्यांच्या घरावर अतिक्रमण करत असल्याने त्यांच्याकडे काहीच पर्याय नाही हा चित्रपटाचा बेसिक थॅाट असून हाच मेसेज समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ‘खडमोड’ करणार आहे. एका मुलाच्या माध्यमातून खडमोड चित्रपटाची गोष्ट उलगडत जाणार आहे. नंदूरबारमधील कोकणा आदिवासी समाजातील ही कथा आहे. या समाजातील एका तरुणाचा बैल हरवतो.
बैल शोधण्यासाठी तो जंगलात जातो आणि तो देखील हरवतो. त्यानंतर त्याला बाहेर पडण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो. यादरम्यान जे घडते ते पडद्यावर पाहायला मिळेल. आज जंगली जनावरे शहरे आणि गावांमध्ये का येत आहेत? हा आज सर्वांना पडलेला प्रश्न चित्रपटातील एक कॅरेक्टर विचारते. या प्रश्नाचे उत्तर खडमोड चित्रपटात प्रेक्षकांना मिळणार आहे. हा संपूर्ण चित्रपट नंदूरबारमध्ये चित्रीत करण्यात आला आहे.
मेघराज मल्लिनाथ कलशेट्टी यांनी एस्थेट प्रॉडक्शनच्या बॅनरखाली खडमोड चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शन, पटकथा आणि लेखन राहुल रामचंद्र पवार यांनी केले आहे. संकलन धनेश गोपाळ यांनी केले आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेतील मेघराज मल्लीनाथ यांच्यासोबत शुभम पवार, अनिल खोपकर, कमलेश अहिरे, तेजस गांगुर्डे, पूजा डोळस, संभाजी जगताप आदी कलाकार आहेत.