मुंबई : ‘खतरों के खिलाडी’ हा देशातील सर्वांत लोकप्रिय स्टंट-बेस्ड रिअॅलिटी शो आहे. या शोचा तेरावा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी या शोचं सूत्रसंचालन करतो. बिग बॉसनंतर या रिअॅलिटी शोचा मोठा चाहतावर्ग आहे. नव्या सिझनमध्ये कोणकोणते स्पर्धक भाग घेणार आहेत, याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. इंडस्ट्रीतील काही लोकप्रिय चेहरे यंदाच्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेत. ‘जय हो’ आणि ‘रेस 3’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री डेझी शाहसुद्धा यंदाच्या सिझनमध्ये स्टंट करताना दिसणार आहे. तर बिग बॉस फेम शिव ठाकरेसुद्धा इतर स्पर्धकांना चांगली टक्कर देणार आहे.
खतरों के खिलाडी या शोमध्ये स्टंट करण्यासाठी स्पर्धकांना किती मानधन मिळतं, हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते. इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, डेझी शाहने मानधनाच्या बाबतीत शिव ठाकरेला मागे टाकलं आहे. डेझीला शिवपेक्षा दुप्पट रक्कम मिळाली आहे. डेझीला प्रत्येक एपिसोडसाठी जवळपास 15 लाख रुपये मानधन मिळणार आहे. तर शिव ठाकरेला जवळपास 6 लाख रुपये मानधन मिळणार असल्याचं कळतंय. याशिवाय रोहित रॉयला सात लाख आणि नायरा बॅनर्जीला सहा लाख रुपये मिळणार आहेत.
खतरों के खिलाडी या शोमध्ये सहभागी होण्याबद्दल डेझी म्हणाली, “मी जरा नर्व्हस आहे आणि उत्सुकसुद्धा आहे. या शोमध्ये सहभागी होणारी मी शेवटची स्पर्धक असल्याने आणि आमचं शूटिंग लगेचच सुरू होणार असल्याने मला तयारीसाठी फार वेळ मिळाला नाही. शोदरम्यान आव्हानांना सामोरं जाण्यासाठी मी मानसिकदृष्ट्या स्वत:ला सक्षम बनवण्याचा प्रयत्न करतेय. आतापर्यंत मी स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जे काही केलं, त्याचा मला खूपच फायदा होणार आहे. पण मला किड्यांची खूप भिती वाटते.”
एकापेक्षा एक खतरनाक स्टंट्स करत कोरिओग्राफर तुषार कालियाने ‘खतरों के खिलाडी 12’चं विजेतेपद पटकावलं होतं. दिग्दर्शक रोहित शेट्टीनेच या सिझनचं सूत्रसंचालन केलं होतं. गेल्या वर्षी जुलैमध्ये हा शो सुरू झाला होता. तर सप्टेंबरमध्ये ग्रँड फिनाले पार पडला. तुषार कालियासोबत जन्नत जुबैर, मोहित मलिक, फैजल शेख आणि रुबिना दिलैक हे चार जण अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते.