गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला ‘धर्मवीर 2’ या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला होता. या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र, गोविंदा, बोमन इराणी यांच्यासोबतच बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खानसुद्धा ‘धर्मवीर 2’च्या ट्रेलर लाँचला पोहोचला होता. त्यावरून आता एका मराठी अभिनेत्याने फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. ‘साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ अशी या चित्रपटाची टॅगलाइन आहे. हिंदुत्वाची गोष्ट सांगणाऱ्या चित्रपटाच्या प्रमोशनला अस्सल पठाण लागला, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
‘छत्रपती शिवरायांनी सर्व जातीधर्मांचा आदर करणारं हिंदुत्व शिकवलंय आपल्याला. हिंदुत्व म्हणजे मुस्लीमद्वेष नव्हे. हे पटत नव्हतं ना? हा घ्या ढळढळीत पुरावा. ‘हिंदुत्वाची गोष्ट’ सांगणार्या सिनेमाच्या प्रमोशनला सुद्धा वन ॲन्ड ओन्ली, ‘द सलमान खान’ हा अस्सल पठाण लागला. भारी वाटलं. धर्म ठेकेदारांना सलमानभाईच्या मागेपुढे करताना बघून लै लै लै भारी वाटलं,’ अशी पोस्ट लिहित त्यांनी टीका केली.
या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानचं स्वागत केलं. यावेळी त्याला पुष्पगुच्छ आणि पैठणीचा शॉल देण्यात आला होता. खासदार श्रीकांत शिंदेसुद्धा यावेळी मंचावर उपस्थित होते. ‘धर्मवीर 2’मध्ये हिंदुत्वाची गोष्ट सांगितली जाणार आहे, असं सातत्याने अधोरेखित केलं जातंय. पण ट्रेलर लाँचला मात्र अस्सल पठाणच लागला, म्हणून किरण माने यांनी टीका केली आहे. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दरम्यान ‘धर्मवीर 2’ या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट येत्या 9 ऑगस्ट रोजी जगभरात मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार होता. मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. याविषयीची माहिती निर्माते मंगेश देसाई यांनी दिली. राज्यात होत असलेली अतिवृष्टी, त्यामुळे ओढवलेल्या पूरपरिस्थितीमुळे चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ‘धर्मवीर 2’च्या पोस्टरवर साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट असा उल्लेख करण्यात आला आहे. धर्मवीर चित्रपटात दिघे साहेबांचे जीवनचरित्र दाखवल्यानंतर आता ‘धर्मवीर 2’मध्ये हिंदुत्त्वाची गोष्ट कशी दाखवली जाणार असून याकडे आता अनेकांचं लक्ष लागलं आहे. प्रवीण तरडेंनीच ‘धर्मवीर 2’चं लेखन, दिग्दर्शन केलंय.