अभिनेता चिन्मय मांडलेकरच्या एका व्हिडीओने सोशल मीडियावर बरीच चर्चा घडवून आणली आहे. मुलाचं नाव ‘जहांगीर’ ठेवलं यावरून त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना ट्रोल केलं जातंय. या ट्रोलिंगला वैतागून अखेर त्याने मोठा निर्णय घेतला. यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही, असं त्याने जाहीर केलंय. पडद्यावर महाराज साकारले तरी खऱ्या आयुष्यात मुलाचं नाव ‘जहांगीर’ ठेवलं, असा ट्रोलिंगचा मूळ सूर होता. त्यामुळे ती भूमिकाच पुन्हा कधी साकारणार नसल्याचं त्याने स्पष्ट केलं. चिन्मयच्या या निर्णयाला अनेकांनी विरोध केला. हा निर्णय मागे घेण्याची विनंती अनेकांनी त्याला केली. आता याचसंदर्भात अभिनेते किरण माने यांची पोस्ट चर्चेत आली आहे.
‘परवा चिन्मय मांडलेकरवर त्या मानाने खूप छोटंसं, किरकोळ ट्रोलिंग झालं. खरंतर तेही चुकीचंच होतं. पण आजकाल जनरली जे होतं त्या तुलनेत खूपच सौम्य होतं. पण त्यानंतर त्याच्या पत्नीने प्रतिक्रिया देताना, “मी ब्राह्मण आहे आणि तो कासार आहे. आम्ही हिंदू आहोत” हे सांगणं फार भयानक होतं. सिंपथीसाठी असेल किंवा रागाच्या भरात असेल, पण हा वाद भलत्याच दिशेला नेणारं आणि असंबद्ध होतं. ट्रोल्सच्या हेतूंना बळकटी देणारं होतं. धर्मांध अंधभक्तांचे ट्रोलिंग हे फोफावणार्या आगीसारखे झाले आहे. हळूहळू सगळेच होरपळणार आहेत यात. कुणाचीच सुटका नाही. त्यातून सुटका हवी असेल तर या ट्रोल्सना राक्षसी बळ देणार्या शक्तीला दणका देणं,’ असं त्यांनी लिहिलं.
‘चिन्मयच्या प्रकरणातला एक मुद्दा महत्त्वाचा आहे, ‘त्याने मुलाचे नाव 2013 साली ठेवले. त्यावेळी तो अजिबात ट्रोल झाला नव्हता. पण आज या मुद्यावर शिवीगाळ होत आहे. याला म्हणतात ‘संविधान धोक्यात येणं’. या झुंडीनं तुम्हाला तुमच्या मुलाचं नाव ठेवायचं ‘स्वातंत्र्य’ ठेवलेलं नाही. जात आणि धर्म या आपल्या खासगी गोष्टी चव्हाट्यावर आणून ‘समता’ नष्ट करण्याचे प्रकार सुरू आहेत. ही दोन मूल्यं नसतील तर ‘बंधुता’ निर्माण कशी होणार? बास. एवढंच लक्षात ठेवा आणि मतदान करा. हे ट्रोलिंग-बिलिंग बंद करणं तुमच्या स्वत:च्या हातात आहे. थंड घ्या,’ असंही त्यांनी म्हटलंय.